पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संकलकाचे मनोगत

 महर्षी दयानंदांचे चरित्र व विचार महाराष्ट्रात फारसे परिचित नाहीत. ज्ञान प्रबोधिनीमध्ये जे चार राष्ट्रभक्त संत आदर्श म्हणून स्वीकारले आहेत त्यामध्ये महर्षी दयानंदांचा समावेश आहे. समर्थ रामदास, स्वामी विवेकानंद व योगी अरविंद या इतर तीन राष्ट्रभक्त संतांच्या विचारांचे संकलन ज्ञान प्रबोधिनीने प्रकाशित केले आहे. 'दयानंद काय म्हणाले ?' असे दयानंदांच्या विचारांचे संकलन प्रकाशित करायचे झाले तर त्यात १) महर्षी दयानंदांचे संक्षिप्त चरित्र, २) दयानंदांची पत्रे व भाषणे यातील निवडक विचार, आणि ३) दयानंदांच्या लिखित वाङ्मयातील निवडक विचार, असे तीन भाग असायला लागतील, असे वाटले. प्रस्तुत भाग हा महर्षी दयानंदांच्या लेखनातील निवडक विचारांचे संकलन आहे. दयानंदांच्या समग्र वाङ्मयात बारा-पंधरा लहान-मोठे ग्रंथ आहेत. त्यापैकी 'सत्यार्थप्रकाश' या त्यांच्या मुख्य ग्रंथातून निवडलेल्या वेच्यांचे हे संकलन आहे. हे त्यांच्या विचारांचे सार नाही. तर प्रबोधिनीमध्ये जो राष्ट्र-घडणीचा विचार व काम चालते त्याला पूरक व प्रेरक असेच वेचे हेतुपुरस्सर निवडले आहेत. ते निवडताना दयानंदांच्या एकूण भूमिकेचा विपर्यास होणार नाही एवढी काळजी घेतली आहे.

 'सत्यार्थप्रकाश' एकूण चौदा प्रकरणांमध्ये किंवा समुल्लासांमध्ये विभागलेला आहे. त्यातील पहिले दहा समुल्लास मंडण' करणारे आहेत. शेवटचे चार समुल्लास 'खंडण' करणारे आहेत. येथे निवडलेले वेचे मुख्यतः पहिल्या दहा समुल्लासातून घेतले आहेत. अकराव्या समुल्लासातील काही वेचेही घेतले आहेत. परंतु ते स्वतंत्रपणे न देता विषयानुसार इतर समुल्लासांतील वेच्यांबरोबरच दिले आहेत. प्रत्येक समुल्लासाच्या सुरुवातीला त्यातील वेच्यांच्या निवडीमागची माझी भूमिका तिरक्या ठशात छापली आहे.

 हे वेचे निवडताना काय भूमिका होती हे कळावे म्हणून Jnana Prabodhini : ANew Experiment in Education, Volume II या ग्रंथातील The Patriot Saints of India या लेखातील महर्षी दयानंदांशी संबंधित भागाचे मराठी भाषांतरही सत्यार्थप्रकाश मधील वेच्यांच्या आधी दिले आहे.

गिरीश श्री. बापट

महर्षी दयानंद काय म्हणाले?
एक