पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असतां रामराजा ताराबाईच्या मुठीत राहून बाळाजीच्या धडपडीकडे उदासीनपणे पहात होता. रामराजा उदासीन राहिला तो कांहीं मतलब साधावा अशा हेतूने राहिला असा अर्थ नव्ह. तर, त्याच्या नैसर्गिक कर्तृत्वहीनतेमुळे त्याला हे औदासीन्य पत्करावे लागलें. रामराजा खुळा आहे अशी इतर लोकांप्रमाणे बाळाजीची खात्री झाली होती. त्याच्याविषयी कोणाच्याच मनांत आदरबुद्धि नव्हती. गयाळ ह्मणून ताराबाई त्याचा द्वेष करी. कर्तृत्वहीन ह्मणून सरदारांचे त्याच्या ठिकाणी प्रेम नसे आणि प्रतिस्पर्धी ह्मणून कोल्हापूरकर त्याचा मत्सर करी. एवंच रामराजा कोणालाच हवा असें वाटत नव्हते. शाहूराजाची इच्छा ह्मणून बाळाजीनें रामराजाला पानगांवाहून आणिला व गादीवर बसविला. त्याला काही तरी राजकारण करून काढून टाकावें अशी बाळाजीची इच्छा होती असे जरी खास ह्मणतां येत नाहीं तत्रापि त्याचे महत्व होईल तितके कमी करण्याच्या इच्छेने बाळाजीने त्याचा शिक्का तीन वर्ष चालू केला नाही. ह्या ग्रंथांतील १७५०तील ३० जानेवारीच्या ( लेखांक २६ ) पत्रावर, काव्येतिहाससंग्रहांतील १७५१ च्या २९ सप्टंबरच्या (३३४ पत्रे, यादी वगैरे) पत्रावर, १७५२ च्या १२ एप्रिलच्या ( पत्रे, यादी वगैरे ३७४ ) पत्रावर व १७५२च्या १५ आक्टोबरच्या ( पत्रे, यादी वगैरे ३९५) पत्रावर शिक्का शाहूराजाचाच आहे. ह्यावरून रामराजाला शाहूराजाच्या इच्छेबरहुकूम बाळाजीनें यद्यपि मान्य केले होते. तत्रापि त्याचा शिक्का चालविण्यांत तीन वर्षे तो धरसोड करीत होता असे दिसते. अर्थात् दुसरा राजा करावयाचा ह्मणजे संभाजीला साताऱ्यास आणावयाचा त्याचा बेत होता असें अनुमान करण्यास प्रवृत्ति होते. नाही तर शाहूच्या मृत्यूनंतर तीन वर्षे शाहूचा शिक्का चालविण्याच्या कामी धरसोड करण्यांत बाळाजीचा कांहींच मतलब नव्हता असें होईल. तसेंच परराष्ट्रांशी केलेल्या तहांतही सातारच्या छत्रपतींचें नांव १७५० सालापासून १७६१ पर्यंत कोठेंहि नाही. जेथे तेथे बाळाजी बाजीरावाचंच नांव प्रमुखलेले दिसतें (लेखांक १।६५।१२९।३०।१४५ ). पुढे १७५३च्या व १७५४च्या शेवटी ताराबाईची धुसफस बाळाजाने मोठ्या युक्तीन बंद केली व रामराजाला निव्वळ बाहुले करून सोडिलें. सातारच्या छत्रपतीचे महत्व समूळ नाहीसे केल्यावर आणीक एक गोष्ट बाळाजीस करावयाची राहिलीच होती. ती गोष्ट ह्मणजे कोल्हापुरची व सातारची गादी एक करून मराठ्यांचे राज्य एकछत्री करणे ही. ह्या हेतूच्या साधनार्थ १७४० त संभाजीशी त्याने गुप्त करार केला. १७५० त हा हेतु साध्य होण्याचा समय आला असतां शाहूच्या हट्टामुळे तो फसला गेला. तरी पुढे अशीच एकादी संधि येईल ह्या आशेने बाळाजीने संभाजीशी पूर्वीचा स्नेह कायम ठेविला (का० पत्रे, यादी वगैरे ३३५). कारण, संभाजीहि वृद्ध झाला असून लवकरच मरणासन्न होईल असा संभव होता. हा संभव ज्यावेळी केव्हां खरा ठरेल त्यावेळी संभाजीचा वारस जो रामराजा त्याला कोल्हापुरची गादी मिळून सातारचे व कोल्हापुरचे राज्य एक करण्याचा फारा दिवसांचा हेतु साध्य