छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत, हिंदुस्थानच्या राजकीय स्थितीची त्रोटक माहिती वरप्रमाणे आहे; आणि त्या काळापासूनचा इतिहास — मराठ्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा इतिहास - ह्मणजे मराठ्यांच्या सत्तेचा उदय, उत्कर्ष व उच्छेद, यांचा इतिहास असून तो यापुढे प्रथित केला आहे.
स्वराज्याचा नाश, स्वराष्ट्राचा उच्छेद हा केव्हांही अत्यंत दुःखदायक असतोच; पण त्याची नुसती आठवणसुद्धां मनाची कालवाकालव करून सोडणारी असते; तथापि थोरामोठ्यांच्या उच्छेदातही जें वैभव गर्भित असतें, तें क्षुद्र मनुष्याच्या उत्कर्षातही असत नाहीं. अस्ताचली चाललेल्या भगवान सूर्यनारायणाच्या अंतिमकलेची – त्याच्या मावळत्या- स्थितीतील तेजाची बरोबरी, आपल्या माध्यान्हीला - पूर्ण उत्कर्षाला आलेला पहिल्या प्रतीचा तारा किंवा ग्रहही करूं शकत नाहीं; ह्मणून मराठ्यांच्या उच्छेदाचा दुःखपर्यवसायी इतिहासही त्यांच्या उत्कषांच्या इतिहासाइतकाच महत्वाचा व वर्णनीय ठरतो. हा इतिहास पुढील पानांत ग्रथित केला आहे; तो अत्यंत बोधप्रद्, मननीय व मनोरंजक आहे; आणि त्याचें मनन करून व त्यापासून योग्य तो बोध घेऊन त्याप्रमाणें वागल्यास, तो कल्याणप्रद होईल, अशी आशा आहे.