पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६०)

व्यवस्था व व्यूहरचनेची सर्व तजवीज त्याला करता येणे शक्य नव्हतें; म्हणून ही सर्व व्यवस्था त्यानें शहाजांवर सोपविली होती, आणि शहाजीनेही ही जबाबदारी आपल्या अंगावर घेऊन ती मोठ्या यशस्त्रीपणानें तडीस गेली होतो. या युद्धांत शहाजीनें जो असामान्य पराक्रम गाजविला, व जे असाधारण कर्तृत्व व्यक्त केले, त्याची बातमी निजामशहाच्या कानों गेली, आणि या युद्धानंतर मलिकंबर, शहाजी व इतर मंडळी जेव्हां शहाच्या दर्शनास गेली त्यावेळी, मलिकंबर यांस जरी त्यानें दरबारी शिरत्याप्रमाणे योग्य आदराने वागविलें तरी त्यानें त्यावेळी शहाजीचाच विशेष बहुमान व विशेष आदर केला; परंतु ह्या गोष्टीचें मलिकंबर यांस अतीशय वैषम्य वाटलें, आपण निजामशाही राज्य जगविण्यांत आद्य प्रवर्तक आहोत, आणि आपल्या सूत्रचालकत्वामुळेच निजामशाही राज्य जगत आहे, हा असून सुद्धा मुर्तुजा निजामशहा हा आपल्यापेक्षां शहाजीचा अधीक बडेजाव माजवितो, या बद्दल मलिकंबरच्या मनांत शहाजीविषयीं अतीशय विकल्प उत्पन्न झाला; आणि याच वेळेपासून शहाजी व मलिकंबर या उभयतांमध्ये द्वेष, मत्सर व बैमनस्य उत्पन्न झालें.

 मलिकंबर यानें मोगल व अदिलशहा या उभयतांचा भातवडी येथील युद्धांत पूर्ण पराजय केल्यानंतर, आदिलशहास पुरा जमिनदोस्त करून आपल्या शेजारचा हा शत्रू पार जमिनदोस्त करून टाकावा असा घाट घातला; व शहाजी व खेळोजी भोंसले या उभयतांसह निजामशाही सैन्यानें अदिलशाही प्रदेशावर विजापूरच्या रोखानें स्वारी केली; मार्गातील त्याच्या ताब्यांतील सोलापूरचा भुईकोट किल्ला हस्तगत करून घेतला; व विजापूरजवळील नवरसपूर* हें गांव जाळून पोळून खाक करून ( इ. स. १६२५ ) ई विजयी सैन्य राजधानीत, अहंमदनगर येथे पुन्हां परत झालें.


आणि शीरपूर व इलौचपूरच्या ईशान्येस सात मैलांवर, सातपुड्याच्या दक्षिणेस बैतूल जिल्ह्यांत, मुक्तागिरी, ही दोन जैन लोकांची मोठी प्रसिद्ध यात्रास्थानें आहेत.

 * तोरखें, ऊर्फ नवरसपूर, ऊर्फ नवरोजपूर हे ठिकाण विजापूरच्या पश्चिमेस विजापूरपासून चार मैलांवर आहे. इब्राहीम अदिलशाहा जगद्गुरू