पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४३)

रंगांत येऊन अगदी पिकून गेलें होतें. त्यावेळी निजामशाही तख्तावर मूर्तिजा, मूर्तजा, किंवा मुर्तुजा, हा नरम, चैनी, ऐदी, व नाकर्ता सुलतान होता. मीर राजूचा सासुरवास दुःसह झाला म्हणजे मलिकंबरची कांस धरावी, आणि मलिकंबरचा जाच असह्य झाला म्हणजे राजूची पायधरणी करावी, अशी कांही वर्षे मूर्तिजानें काढल्यावर त्यानें दक्षिणी व परदेशी यांच्या पांडेपासून मुक्त होण्याकरितां, तिसरा एक पक्ष निर्माण केला; तो पक्ष म्हणजे मराठ्यांचा पक्ष; अवश्यास व परिंड्यास असतांना मूर्तिजाने मालोची भोंसले यांस जवळ केले होतें. मालोजीचा मुलगा शहाजी याचें लग्न जाधवरावाच्या मुलीशी जुळवून देण्यांत मूर्तिजाचे बरेंच अंग होतें; ह्या कृत्यानें मालोजी उपकार बद्ध झाला; व जाधवरावाच्या बरोबरीचा तोलदार सरदारीह बनला आणि अशा तऱ्हेनें तिसरा पक्ष उभारण्याच्या लायकीचा ठरला. परंतु ह्या तृतीय पक्षाचें पुढारीपण गाजवीत असतां मालोजी शक १५४१ त वारल्यावर पक्षाध्यक्षत्व शिताफीनें गाजविण्यास नाना प्रकारांनी लायक असा आणिक एक पुरुष मूर्तिजाला लाभला. तो कर्ता पुरुष म्हणजे तरुण, महत्त्वाकांक्षी व कर्तबगार शहाजी भोसला हा होय. शहाजी राजाचें जें गुणवर्णन जयराम कवीनें केले आहे त्याचा अनुमाद शिव- दिग्विजय व शिव प्रताप ह्या दोन्हीं बखरींत सांपडतो. शूर, गुणश, परॅगितज्ञ, जातीनें मर्द, युद्धन्यूहकुशल, शहाची मर्जी सांभाळून वागणारा, परंतु स्वतःचा कुर्रा जाऊं न देणारा, असा गुणगणमंडित जो शहाजी भोसला, त्याच्या द्वारा राज्यांत मराठ्यांचा तिसरा पक्ष उभारून दक्षिणी व परदेशी पक्षांना जरबेंत ठेवण्याची व्यवस्था मूर्तिजानें केली. दरबारी, एकान्तांत व लोकांतांत जाण्यायेण्याची शहाजीला सदर परवानगी असे; शहाच्या मर्जीचें एक मासलेवाईक उदाहरण बखरकार देतो. शक १५४५ त शहाजीला संभाजी हा प्रथम पुत्र झाला, तेव्हां शाहाने स्वतः मोठा समारंभ करून शहाजीस वस्त्रे, भूषणे, अलंकार, परगणे व किल्ला बक्षीस दिला ( शिवाजीप्रताप ). शहाच्या मर्जीचे दुसरे उदाहरण बखरकार देतो तेंहि असेच मासलेवाईक आहे. मूर्तिजाचा जेव्हां अंत झाला तेव्हा त्यानें दक्षिणी व परदेशी मुसलमानांवर विश्वास न ठेवितां मराठा जो शहाजी राजा त्याच्यावर आपल्या बायकापोरांना सांभाळण्याचें काम