पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२७९ )

राघव नायकास राज्य चालविण्याची अक्कल नाहीं, पात्रता नाहीं, अथवा सामर्थ्यही नाहीं, सर्व राज्यामध्यें पूर्णपणे अव्यवस्था व अंदाधुंदी माजली असून सर्व प्रजा असंतुष्ट झाली आहे; तरी तुम्ही तंजावर प्रांत काबीज करून तेथील सर्व कारभार आपल्या हातीं ध्यावा; " अशी विनंती केली. त्याप्रमाणे व्यंकोजीनें आदिलशाही सैन्याच्या मदतीनें तंजावरवर हल्ला करून ते शहर आपल्या इस्तगत करून घेतले. त्यावेळी उडालेल्या चकमकींत विजयराघव व त्याचे भाऊबंद मारले गेले; व तंजावर व्यंकोजीच्या ताब्यांत येऊन ( इ० सन १६७४ मध्ये ) आदिलशाहानें व्यंकोजी राजास तंजावरची जहागीर वंश- परंपरा बक्षीस करून दिली; व नंतर इ. सन १६७५ मध्ये व्यंकोजीनें बंग- ळूर येथील ठाणें हालवून तंजावर ही आपल्या राहण्याची जागा, व राजधानी केली.

 त्यानंतर एक वर्षान- म्हणजे इ० सन १६७६ मध्ये शिवाजीनें कर्नाटक प्रांतावर स्वारी केली. त्यावेळी व्यंकोजी व शिवाजी यांच्यामध्ये घडलेल्या एकंदर व्यवहाराची हकीकत पुढे शिवाजीच्या चरित्रांत येणार असल्यानें, त्यासंबंधानें या ठिकाणीं अधिक उल्लेख केला नाहीं; तथापि थोडक्यांत म्हणजे शिवाजी पुढे व्यंकोजीचा निभाव न लागून हे तंजावरचें राज्य शिवाजीच्या हस्तगत झाले. व नंतर, “ तंजावर व त्रिचनापल्ली येथील जहागिरीवर शिवा- जीचाच इक आहे; " असें विजापूर दरबारानेंही कबूल केले. त्या व इतर कारणांमुळे व्यंकोजी उदास होऊन, व सर्व राज्यकारभार सोडून देऊन, त्यानें वैराग्यवृत्ति धारण केली. ही गोष्ट शिवाजीचा कर्नाटक प्रांतांतील मुख्य कार भारी रघुनाथ नारायण हणमंते याच्या मार्फत शिवाजीस कळल्यावर त्यास अतिशय खेद झाला; व त्यानें व्यंकोजीस एक खरमरित पत्र लिहून त्यांत " तुझें कर्तव्य काय १ व तूं करतोस काय ? " अशा प्रकारें त्याची योग्य कानउघाडणी केली; व त्याचा योग्य तो परिणाम होऊन व्यंकोजीनें वैराग्य- वृत्तीचा त्याग केला; व शिवाजीनेंही व्यंकोजीचें समाधान व्हावें, म्हणून अत्यंत उदारपणानें वडिलार्जित उत्पन्नावरील आपला सर्व हक्क व्यंकोजीस दिला; व व्यंकोजी हा पुन्हां पूर्वीप्रमाणे तंजावरच्या राज्याचा उपभोग घेऊं लागला.