पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२८ )

मनाची ठेवण व शहाजीच्या मनाची ठेवण, अगदर्दीच भिन्न प्रकारची होती; हेच शहाजी व इतर मराठे सरदार यांच्या स्वभावामधील महत्वाचे वैशिष्य आहे. जित राष्ट्रांतील कर्त्या व्यक्तींचा जन्म, उदय, व उत्कर्ष जेते अस लेल्या राज्यकर्त्यांच्या वृक्षछायत झालेला असतो; व प्रचंड वृक्षाखालीं लहान झाडाची वाढ जशी खुरटून, कांहीं विविक्षित मर्यादेपर्यंतच ती होत जाते, त्याप्रमाणेच त्या कर्त्या व्यक्तीने राज्यकर्त्यांशी सहकारिता केल्यानंतर, व राज्यसत्ता, स्थीर व स्थाईक करून तिची वृद्धी करण्याचा प्रयत्न केल्यानं तर त्याच्या वैभवाची वाढ कांहीं ठरीव मर्यादेपर्यंतच जाऊं शकते. तथापि परकीय राजसत्तेच्या अमलाखालीं, जेते लोकांच्या बरोबरीनें, किंवा कांहीं प्रसंगी, जेते लोकांहूनही अधिक अधिकार, सत्ता, व वैभव, जित लोकांपैकी मुरारराव जाधवराव, या सारख्या कांही कर्तबगार व्यक्तींस सहकारितेमुळे लाभल्यानंतर " मिळविलें तें टिकलें, व जमल्यास त्यांत भर घातली म्हणजे कमावलें " अशी त्यांची वृत्ती बनते. सहकारितेमुळे झालेले वैभव, हेच मुळ राज्यकर्त्यांच्या मेहेरबानीमुळे लाभलेले असल्यामुळे स्वतःच्या आयुष्यात " स्वतः " ही व्यक्ति त्यास विसरावी लागते; व आपणाला राज्याच्या कल्याणाकरितां जे जे करावे लागतें तें तें सर्व आपल्या व आपल्या जित बांधवांच्या कल्याणाकरितांच आपण करीत आहोत, अशी त्याची भ्रामक समजूत होते; किंवा राजकार्य ही प्रधान गोष्ट, व लोक- कल्याण ही दुय्यम गोष्ट असें तो मानू लागतो. राज्यरक्षण व सुरक्षितता या दोन प्रधान बाबती संभाळून मग शक्य तें लोककल्याण करावयाचे अशी त्याची मनोवृत्ति बनते; अथवा याच विचारसरणीनें उलट घेतल्यास "आपण कितीही वैभव संपन्न असलो, तरी अखेरीस आपण जितांपैकींच आहोत आणि आपले हैं वैभव निव्वळ सहकारितेमुळेच कायम राहिले आहे, सहकारितेच्या संजी- बनीनें तें जिवंत ठेविलें आहे," ही गोष्ट पूर्णपणे विसरून जाऊन आपण जित लोकांच्या वर्गातील नसून, जेत्यांच्या श्रेष्ठ वर्गातील आहोत" असे त्यास वाटू लागते. सहकारितेमुळे प्राप्त झालेल्या वैभवाच्या व सुखाच्या संबई- व ती संवय अंगांत मुरून त्याचा स्वभाव बनल्यानें- जित लोकांचा उत्कर्ष सुराज्यानें करितां येतो, अशी त्याची समजूत होते; आणि तो तें राज्ययंत्र