Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०७ )

योद्धयांपैकी प्रत्येक जण आपल्या हातीं भाला घेतो, आणि शत्रूकडील दहा हजार लोकांनाही तृणवत मानून तो त्यांच्याशीं, "लढाईला या " असे आव्हान करून युद्धास प्रवृत्त होतो. अशा स्थितीत त्या लढवय्या लोकांनी मार्गांत भेट- लेल्या कोणत्याही मनुष्यास ठार मारिले तर त्याबद्दल त्यांना कायद्यांत शासन सांगितलेले नाहीं; सरकारचें सैन्य कोणत्याही मोहिमेवर निघाले म्हणजे हे लढ- वय्ये नौबती वगैरे वाद्यांच्या तालावर डुलत डुलत मोठ्या तोल्यानें चालतात; शिवाय स्वभावाने क्रूर अशा शेंकडों हत्तीसही ते अंमल चारून मस्त करितात. शत्रूशीं मुकाबला होऊन हातघाईची वेळ आली असें दिसताच ते फार मादक मद्य घेतात; मस्त केलेल्या हत्तीसह आपली एक फळी करून ते शत्रूवर धांवत जाऊन तुटून पडतात, जें जें समोर येईल त्या सर्वांचा फन्ना उडवीत ते पुढे जातात, व त्यांच्या पुढे कोणत्याही शत्रूचा टिकाव न लागतां ते त्यास माघार घेण्यास लावितात; अशा प्रकारचे हे शूर लढवय्ये, व हत्ती, आपल्या पदरीं आहेत, म्हणून तेथील राज्यकर्त्यांला मोठा अभिमान वाटतो; व त्यांच्या बळावर तो आसपासच्या राज्यांना कसपटाप्रमाणे मानून त्यांची अवहेलना करितो. "
 वरील विवेचनावरून महाराष्ट्रांतील तत्कालीन परिस्थितीसंबंध बोध होतो यांत संशय नाहीं; या राज्यकर्त्याची हिंदुस्थानाबाहेर ही कीर्ति पसरलेली असून त्यानें आपले वकील इराणचा राजा दुसरा खोश्रोझ उर्फ खुश्रू यांजकडे इ० सन ६२५-२६मध्ये पाठविले होतें; व परत भेटी दाखल त्याचे वकीलही पुलिकेशीच्या दरबारीं आले असून त्यांचा त्यानें मोठा मानसन्मान केला होता; त्यावेळच्या दरबाराचा देखावा + अजिंठा येथील लेण्यांत नंबर


 + अजिंठा है गांव, व त्या गांवाच्या हद्दींतील हीं लेणीं निशाम सरकारच्या राज्यांत आहेत; तथापि तीं पूर्व खानदेशच्या सरहद्दीस लागून आहेत; हीं लेणीं पूर्व खानदेश जिल्ह्याचे मुख्य ठिकाण जळगांव येथून अजमासें अडतीस मैलांवर असून जळगावहून थेट अजिंठ्या पर्यंत नेरी, पहूर मार्गानें पक्की व उत्तम सडक आहे. या सडकेच्या मार्गांवर वाकद है खानदेशाच्या सरहद्दीचें शेवटले जामनेर तालुक्यांतील गांव असून त्यास मोगलाईतील अजिंठा गांवची सरहद्द लागलेली आहे; त्यांस " फरदापूरची लेणीं" असें ही म्हणतात; कारण अजिंठ्या प्रमाणेच फरदापुर है मोंगली हद्दींतील गांव या लेण्यापासून अजमायें पांच मैलावर आहे;