पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मनोगत मराठी प्रतिभावंतांचे वैशिष्ट्य म्हणजे महाभारतातील ययाती उपाख्यानावर केलेली विपुल ललित साहित्य निर्मिती. आश्चर्य म्हणजे संस्कृतमध्येही अभिजात गाजलेली साहित्यकृती या उपाख्यानावर प्रसिद्ध नाही. कै. भाऊसाहेब खांडेकरांनी तर शब्दश: लाख मोलाची 'ययाति' कादंबरी लिहून ज्ञानपीठ सन्मान वाढविला. एकूण अठरा ललित पुस्तके या उपाख्यानावर आधारित असून, शिवाय 'ययाति' ला ज्ञानपीठ पुरस्कार मिळून, एकही स्वतंत्र समीक्षा ग्रंथ या विषयावर नाही याची खंत वाटत होती. सुदैवाने गुरुवर्य डॉ. ह. कि. तोडमल यांच्या मार्गदर्शनाखाली 'महाभारतावर आधारित अर्वाचीन मराठी ललित साहित्य' अभ्यासले. पुणे विद्यापीठाने १९७९ सालीच पीएच्. डी. पदवी दिली. प्रबंध अद्यापही प्रकाशनाची वाट पहात आहे. प्रका- शकांशी संपर्क साधण्यापेक्षा स्वतःच हे ग्रंथ प्रकाशनाचे धाडस महाराष्ट्र रसिकांच्या आणि महाभारत प्रेमी जनांच्या विश्वासावर केले आहे. सुयोगाने आदरणीय डॉ. गो. के. भट यांनी आपला 'अभिप्राय ' प्रस्तावना म्हणून छापण्यास अनुमती दिली. त्यांचे ऋण शब्दातीत आहे. वंदनीय तात्यासाहेब शिरवाडकरांना 'ज्ञानपीठ' गौरव प्राप्त झाला. मन आनंदी झाले. त्या उत्साहात त्यांची परवानगी गृहीत धरून हा ग्रंथ त्यांना व महाभारत प्रेमी रसिकांना सादर समर्पित केला आहे. 'बेन्स' च्या सौजन्याने आतील छायाचित्र उपलब्ध झाले. त्यांचेही आभार! या ग्रंथाच्या मुद्रण व्यवस्थापनाची जबाबदारी प्रा. पंडितराव निजामपूरकर व श्री. राधाकिसन दिघे यांनी स्वीकारली. मुद्रणशोधन श्री. वेल्हाळ सर यांनी केले. मुद्रण श्री. संदीप व संजय लाहोटी ह्या बंधूनी केले. ग्रंथालयीन वर्गांक श्री. राजेंद्र कुम्भार यांनी काढून दिला. मुखपृष्ठ संकल्पना श्री. सदाशिव मुकणे व श्री. मोहन क्षत्रिय यांची आहे. या सर्वांचे आभार परिवारातील आप्त संबंधित असल्याने अव्यक्त ठेवतो. महाभारत प्रेमी रसिकांना विनम्र अभिवादन ! महाशिवरात्री , ६ मार्च, १९८९ भास्कर गिरधारी