पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/67

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण तिसरें.
---------------
वृत्तगर्भ शब्द.

 मागच्या दोन प्रकरणांत आम्हीं कवित्वगर्भ व नीतिगर्भ शब्दांविषयी ऊहापोह करून शब्दांचे ठायीं कवित्व म्हणजे चारुतामूलक कल्पना व लोकांचा उच्चावचस्थिति हीं कशी प्रतिबिंबित झालेली असतात याची परिस्फुटता केली. आतां ह्या प्रकरणांत वृत्तगर्भ शब्दांविषयी ऊहापोह करावयाचे आम्हीं योजले आहे. म्हणजे आम्ही शब्दांच्या परीक्षणापासून गत गोष्टींचे ज्ञान कसे प्राप्त होते, हे दाखविणार आहों. वृत्ताची व्याप्ति कवित्व व उच्चावचभाव ह्यांचेपेक्षा अधिक आहे व ती अधिक आहे हे पुढील विवरणावरून स्पष्ट होईलच. आतां ह्या प्रकरणांत कोणचा विषय येईल, हे अधिक खुलासा करून सांगणे इष्ट आहे व तशीच पुढील विषयांची सदरे आम्ही कशी पाडणार आहों याचेही थोडक्यांत दिग्दर्शन करणे आवश्यक आहे; कारण तसे केले असतां आमच्या वाचकांस ह्या भागांतील विषयाचे सुलभ रीतीनें ग्रहण करता येईल.

 वृत्त म्हणजे गतगोष्टी किंवा गतगोष्टींचे ज्ञान. वृत्त शब्दामध्ये आम्ही ज्या वस्तूंचा अंतर्भाव करतो, त्या ह्या:--प्राचीन काळचा व अर्वाचीन काळचा इतिहास, नानाविध स्थळांची माहिती, आपल्या चालीरीति, आपले आचारविचार, आपली मानलेली कर्तव्ये, आपल्या देशासंबंधी इतर प्रकारची माहिती, इत्यादि. ही वृत्त शब्दाची व्याप्ति मोठी आहे, असे वाचकांस तेव्हांच कळून येईल. ह्या प्रकरणांत प्रथम आम्हीं आर्य लोकांचे मध्य एशियांतून भरतखंडाप्रत आगमन, आपणा भारतीय