पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/66

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४     मराठी शब्दांचे उद्घाटन.

शब्दांचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न नाहीं. भाषाशास्त्राच्या ज्या शाखेकडे अद्याप आपल्या लोकांचे मुळीच लक्ष गेलेले नाहीं तिकडे ते जाणे किती आवश्यक व इष्ट आहे व किती लाभप्रद असून मनोरंजक आहे हे दाखविण्याचा आमचा मुख्यत्वेकरून प्रयत्न आहे. भाषेच्या शब्दांचे परीक्षण केल्यापासून नानाविध माहिती कशी मिळण्याजोगी आहे हे कांहीं उदाहरणांनी वाचकांच्या प्रतीतीस आणून दिलें म्हणजे आमचा इष्ठ हेतु सिद्धीस गेला असे आम्हीं समजतों.

ह्या भागांत शब्दांचे जें उद्घाटन केले आहे, त्यावरून भाषेतील शब्दांचे ठायीं नीतीचे किंवा अनीतीचे बीज आढळते असे वाचकांस आढळून येईल. शब्द हे जगांतील सुखदुःखाच्या व मनुष्यांच्या चांगल्या किंवा वाईट मनोविकारांच्या प्रतिमाच होत. जगाची स्थिति व मनाची स्थिति ह्या तोलण्याचा तराजू म्हणजे भाषेतील शब्द. शब्दांच्या परीक्षणापासून एकाद्या देशाची नैतिकदृष्ट्या स्थिति कशी आहे, हे आपणास ठोकळ मानाने ठरवितां येते व कधी कधी तर इतर साधनांवरून मिळणाऱ्या माहितीपेक्षां शब्दाच्या अभ्यासापासूनच अधिक सूक्ष्म माहिती मिळते.