पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/5

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
उपोद्घात.

आम्ही मराठी शब्दांचा वर निर्दिष्ट केलेल्या पद्धतीवर अभ्यास केल्यापासून आपणांस काय काय चमत्कारिक, उपयोगी व लक्ष्यांत बाळगण्याजोगी माहिती मिळण्याजोगी आहे याचें कांहीं उदाहरणांनी स्पष्टीकरण करणार आहों. आम्ही पुढें जें विवरण करणार आहों तें म्हणजे सर्वांगांनीं संपूर्ण होईल असें नाहीं, व तें संपूर्ण करण्याचा आमचा संकल्पही नाहीं. कांकीं हें विवरण सर्वांगांनीं संपूर्ण करणें हें आमच्या सारख्या शब्दमीमांसेच्या महत्त्वाची प्रथमच चर्चा करणाऱ्या ग्रंथकारास शक्य नाहीं. आतां जरी आमचें विवरण प्रत्येक शब्दामध्यें अंतर्भूत असलेलें संपूर्ण ज्ञान परिस्फुट करणार नाहीं, तरी त्यावरून वाचकांस शब्दांच्या अभ्यासाचे महत्त्व अंशतः तरी कळून येईल यांत संशय नाहीं. जे शब्द आपण नेहेमीं उच्चारतों, जे शब्द आपण घरीदारी, बाजारांत, दुकानांत, प्रेमाच्या किंवा रागाच्या भाषणांत, किंवा हरएक प्रकारचे रोजचे व्यवहार करतांना योजतों, जे शब्द आपण केवळ विचार प्रकट करण्याची साधनें म्हणून समजतों, ते शब्दसुद्धां जिज्ञासूंची जिज्ञासा तृप्त करून त्यांच्या मनास आनंदित करण्यास समर्थ असतात असें वाचकांस आढळून येईल.
 आपली मराठी भाषा अनेक भाषांच्या शब्दसंग्रहानें समृद्ध आहे. मेणाप्रमाणें वाटेल त्या तऱ्हेनें वळवितां येणारी, मनोगत विचार ओतावयास तऱ्हेतऱ्हेच्या अनंत ठशांनीं समृद्ध असलेली व अत्यंत प्रगल्भ जी जगद्वंद्य संस्कृत भाषा तिची मराठी भाषा ही एक भाग्यशाली कन्या आहे. संस्कृतीच्या इतर कन्यकांपेक्षां ( म्हणजे गुजराथी, बंगाली व हिंदी ह्या भाषांपेक्षां ) मराठीमध्यें मातेची शक्ति व सामर्थ्य, शुचिता व सरळपणा, साधनें व साधनें घडविण्याची ताकत, सौंदर्य व