पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/36

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे३४     मराठी शब्दांचे उद्घाटन.

मनेंकरून पाप कधीही केले नाहीं त्याची मुद्रा सदैव प्रफुल्लित असावयाची. कोणी कांहीं बोलला किंवा कोणाविषयीं बोलला, तरी त्याला लज्जित होण्याचे कारण नाही. त्याचे अंतःकरण पवित्र व निर्मळ असल्याकारणाने त्याच्या तोंडावरील अकृत्रिम तजेला नाहीसा होण्याचे कारण नाहीं. अशा प्रकारच्या शुद्ध अंत:करणाचे व चेहऱ्यावरील तजेल्याचे साततिक साहचर्य असल्यामुळे कार्यवाचक शब्द कारणाबद्दल योजला जाणे हे अत्यंत साहजिक आहे. ज्या पुरुषाने निर्मळ अंतःकरणाच्या मनुष्याच्या चेहऱ्याचा न ढळणारा तजेला प्रथम अवलोकिला, व पापी मनुष्याच्या चेहऱ्यावरील तजेला क्षणोक्षणीं नाहींसा होत असलेला अवलोकिला, आणि शुद्धवर्तनक्रमाचे चेहऱ्याच्या तजेल्याशी तादात्म्य करून सोडलें, त्याने आब्रू ह्या शब्दाने किती सूक्ष्म निरीक्षण व कार्यकारणभावाच्या निकट संबंधाचे पूर्णग्रहण ही द्योतीत केली आहेत, व किती गंभीर परंतु कोमळ कवित्व प्रकट केलें आहे बरें ?

 एथवर केलेल्या कवित्वगर्भ शब्दांच्या उद्घाटनावरून वाचकांच्या नजरेस आलेच असेल की, कवित्व हे जगांतील सर्व प्रकारच्या व्यवहारांत दृष्टीस पडते. सामान्यतः ज्यास कवित्व म्हटले जातें तें कांहीं विशिष्ट ग्रंथांत मात्र दृष्टीस पडते. परंतु कवित्व ह्याचा खरा व विस्तृत अर्थ मनांत आणला असतां आपणास असे कबूल करावे लागेल की, कवित्व रोजच्या व्यवहारांत, शास्त्रांत व तत्वप्रतिपादनांत, वगैरे सर्व ठिकाणी दृष्टीस पडते. आणि हे कवित्व सर्वत्र ठिकाणी दृष्टीस पडणारच. कारण मनुष्याचे मनोव्यापार व मनोविकार ही जोपर्यंत हल्लींच्याप्रमाणे राहतील तोंपर्यंत कवित्व त्याच्या अंगांत खिळून राहिलेले असणारच. वर वर जरी विचार केला, तरी हे कवित्व किती