पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/19

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण पहिले.
----------
कवित्वगर्भ शब्द.

 आम्ही उपोद्घातांत म्हटले होते की, भाषेच्या शब्दांमध्ये कवित्व, नीति आणि वृत्त ही दृष्टीस पडतात. ह्या प्रकरणामध्ये शब्दगत कवित्वाचे अधिक खुलासेवार निरूपण करावयाचे आम्ही योजले आहे. कवित्व म्हणजे काय हे वाचकांस सांगितले पाहिजे. सामान्य जनांचा असा समज असतो की, गणमात्रादिकांच्या कांहीं विशिष्ट अनुक्रमाने व यमकांदिकांनी उपलक्षित अशी जी शब्दांची रचना तेच काव्य होय. परंतु ही छंदोबद्ध रचना काव्यास आवश्यक नाहीं. स्त्रीच्या स्त्रीत्वास जशी नथेची आवश्यकता नाहीं तशी काव्याच्या काव्यत्वास छंदोबद्ध रचनेची आवश्यकता नाहीं. काव्याचे काव्यत्व शब्दादिकांच्या कांहीं विशिष्ट रचनेवर अवलंबून नसते. ते अंतर्गत विचारांच्या चारुतेवर अवलंबून असते. प्रत्येक देशाच्या विद्वानांचे हेच मत आहे. ते छंदोबद्ध रचनेस महत्त्व देत नाहींत. ही रचना काव्याचे बाह्य स्वरूप अधिक मनोहर करते इतकेंच. आपल्या प्राचीन साहित्यशास्त्रकारांनी काव्याच्या वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत, परंतु एकाही साहित्यशास्त्रकाराने छंदोबद्ध रचना ही काव्याचा एक आवश्यक गुण आहे, म्हणजे ह्या प्रकारच्या रचनेवांचून काव्यास काव्यत्व प्राप्त व्हावयाचें नाहीं, असे म्हटलेले नाहीं. ह्याचे साहित्यशास्त्रकारांचे काव्याच्या लक्षणाचे स्वरूप मनांत आणून आम्ही कवित्वगर्भ ह्या शब्दांतील कवित्व हा शब्द योजला आहे.

 मनोहर सादृश्याच्या किंवा मनोहर आरोपाच्या किंवा मनोविकार क्षुब्ध झाले असतां सहज होणाऱ्या अतिशयोक्तीच्या