Jump to content

पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे     उपोद्घात.     १५

दाखल झाले. पुढे काय काय झाले याचा तपशील न देतां आम्ही थोडक्यांत इतकेच सांगतों कीं, मुसलमानांचा संहार करण्याचा हा क्रम धर्मवेडाची लाट कमी किंवा ज्यास्ती प्रबल होई त्या मानाने २०० वर्षे पुढे चालत राहिला. ह्या कृत्यामध्ये फ्रेंच लोकांनी आपल्या संख्येने, दृढनिश्चयाने आणि महत्त्वानें बाकीच्या युरोपी राष्ट्रांस मागें सारले, ते इतकें कीं, मुसलमानी लोक फ्रांक याच नांवाने सर्व धर्मयोद्धयांचा निर्देश करू लागले. अशा रीतीने फ्रांक हा शब्द जो प्रथम जर्मनीतील एका जनसमूहाचा वाचक होता, व जो पुढे सर्व फ्रान्सांतील लोकांचा वाचक झाला, तोच मुसलमानी भाषेमध्ये सर्व युरोपी लोकांचा वाचक झाला, पुढे पालेस्टाईन मधून तो शब्द अरबस्तानांत उतरला व व्यापारी अरबांसहवर्तमान हिंदुस्तानांत आला. इ०स० १५०० मध्ये पोर्चुगीज लोकांचे हिंदूस किरिस्ताव करण्याचे मिशन जेव्हां मलबारच्या किनाऱ्यावर येऊन थडकलें तेव्हां अरब लोकांस पोर्चुगीज लोक पूर्वी माहित होतेच व ते त्यांस अर्थातच फिरंगी लोक असे म्हणू लागले. कारण त्यांच्या भाषेत फिरंगी ह्या शब्दाने सर्व यूरोपी लोक असा बोध होत असे. परंतु आपणास युरोपी लोक ठाऊक नसल्यामुळे जे यूरोपी लोक पहिल्यानेच आपल्या दृष्टीस पडले त्यांचा वाचक फिरंगी हा शब्द झाला, व त्यांच्या मागून, डच, फ्रेंच व इंग्रज वगैरे यूरोपी लोक आले, त्यांसही फिरंगी हा शब्द आपण लावू लागलों. पण सर्वांसच फिरंगी म्हणण्यापासून घोंटाळा होऊन तो शब्द हल्ली ( निदान कोंकणपट्टीत तरी) चिरपरिचित अशा पोर्तुगीज लोकांस मात्र लावण्यांत येऊ लागला. घाटावर जुने लोक सर्व यूरोपी लोकांस फिरंगी म्हणतात, परंतु तेथेही हा प्रचार हल्लीं कमी होत चालला आहे.