पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याचे परिणाम होऊन तो समाजाच्या मध्यप्रवाहात आला. तरी छुपे अन्याय, अत्याचार मात्र सुरूच आहेत. बदलत्या सामाजिक परिस्थितीने उंचावलेले जीवनमान, शिक्षितता यांमुळे व तुलनेने अन्याय, अत्याचार कमी झाल्याने दलित साहित्यात पहिली तीव्रता राहिली नाही; पण जागतिकिकरणामुळे समाजापुढे उभे राहिलेले नवे प्रश्न कवेत घेण्यास मात्र वर्तमान दलित साहित्य अपुरे पडत आहे. ग्रामीण, स्त्रीवादी साहित्याप्रमाणेच दलित साहित्य असा ठळक प्रभाव व प्रवाह क्षीण झाला आहे. आता माणूस नावाच्या समग्र समाजजीवनाचा शोध व जगण्याचे नवे प्रश्न यांचे भान ठेवतच समग्र वंचित वर्गाला भविष्याची वाटचाल करावी लागणार आहे. शिक्षणातील खासगीकरण, आरक्षणाचा विस्तार (इतर मागासवर्गीय, मराठे, मुसलमान इत्यादी), महाग होत जाणारे आरोग्य, बदलती जीवनशैली, वाढती विषमता हे दलित समाजापुढील नवे प्रश्न आहे. जातीय प्रश्नांची जागा आर्थिक प्रश्न व परिवर्तनांनी घेतल्याने संघर्षाचे स्वरूप भिन्न झाल्याने भविष्याचे साहित्य त्याला कवेत घेण्याचे आव्हान देत आहे. दलितांचे रूपांतर आर्थिक सवर्णात होणे हाही एक पेच आहेच.

मराठी वंचित साहित्य/५६