पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/5

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भूमिका


 ‘मराठी वंचित साहित्य' या छोटेखानी पुस्तकाचं बीज माझ्या मनात रुजलं ते १९८०-८५ च्या दरम्यान, तेव्हा मी वंचित विकासाच्या कार्यात सक्रिय होतो. “समाज-सेवा' त्रैमासिकाचे संपादन कार्य करीत असल्याच्या पाच वर्षांच्या (१९८९-९४) काळात अनेक विशेषांक प्रकाशित, संपादित केले होते. त्यांत एक 'वंचित विकास विशेषांक' (एप्रिल-सप्टेंबर, १९९२) होता. तेव्हा मराठी साहित्यातील ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य वाङ्मयाचे वंचित प्रवाहच असल्याची जाणीव झाली होती. मराठी साहित्य इतिहास, समीक्षा वाचत असताना एक गोष्ट माझ्या शोध, संशोधन, समीक्षेत खटकत राहिली की, वरील तीन वाङ्मय प्रवाहाप्रमाणे दलितेतर वंचितांबद्दल मराठीत विपुल लिहिलं गेलं; परंतु त्याची स्वतंत्र वाङ्मय प्रवाह म्हणून कुणीच कधी नोंद घेतली नाही. या त्रुटीची भरपाई करायची म्हणून मी एक छोटं टिपण वा लेख तयार केला आणि तो ‘परिवर्तनाचा वाटसरू' या पाक्षिकाकडे पाठवून दिला. तो लगेचच १६ ते ३० सप्टेंबर, २००७ च्या अंकात प्रकाशित झाला. एका खोचक प्रतिक्रियेचा अपवाद वगळता त्या लेखाचं स्वागत झालं. पुढे अनेकदा ‘वंचित' शब्द मराठी साहित्य इतिहास, समीक्षा नोंदीत वापरला जाऊ लागला, असे लक्षात आले.
 उपरोक्त टिपण विस्तारून लिहायचे डोक्यात असूनही त्याला मध्यंतरीच्या काळात हात लागला नाही; पण वेळोवेळी मी त्या अनुषंगाने वाचत, संदर्भ गोळा करीत राहिलो. काही दिवसांपूर्वी सुविख्यात समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांचा अचानक फोन आला. “माझे अमरावतीचे मित्र प्राचार्य डॉ. रमेश अंधारे ग्रंथाली'साठी ‘वर्तमान महाराष्ट्र' ग्रंथाचे संपादन करीत आहेत. त्यांना