पान:मराठी रंगभुमी.djvu/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३९
भाग १ ला.

विद्यार्थ्यांकडून चांगल्या चांगल्या इंग्रजी आणि संस्कृत नाटकांचे प्रयोगही होऊ लागले; व “ सूत्रधाराने गावें व पात्रांनी बोलावें, आणि सूत्रधाराचे गाणे संपेपर्यंत पात्रांनी शिव शिव हे शंकरा!' करीत किंवा जोडवी आणि लुगडी सावरीत बसावें हा पूर्वीचा प्रकार न आवडून व ही हिश्शेदारी अप्रशस्त वाटून ग्रंथाप्रमाणे नाटक- प्रयोग होऊ लागले." ह्मणजे सूत्रधाराचे आरंभाचे काम संपले की, त्याला कायमची रजा मिळू लागली; व पुस्तकांत जशी भाषणे किंवा पये असतील तशी पात्रे ह्मणं लागली. " एकंदरीत पूर्वी सूत्रधार नांवाची जी व्यक्ति पात्रांच्या कामांत नेहमी हात घालीत असे आणि वेळ अवेळ न पाहतां पात्रांचे विचार गाऊन दाखवीत असे तिला अजिबात फांटा मिळाला. सूत्र- धाराला सर्व पात्रांनी आपापसांत वांटून घेतल्याबरोबर विदूषकाचाही फाजिलपणा नाहीसा झाला; व गाण्याचे काम विभागून गेल्यामुळे व्यवस्थित रीतीने होऊ लागले."
 या वेळी मुंबईस इंग्रजी नाटककंपन्या येत असत व त्यांचे इंग्रजी भाषेत अभिनययुक्त खेळ होत असत. या कंपन्यांची टापटीप, प्रयोग करण्याची पद्धत, त्या त्या पात्रांच्या स्वभावाबद्दल लोकांच्या मनावर ठसा उमट- विण्याची त्यांची शैली, हर्षशोकादि प्रसंगी ताबडतोब मुद्रा बदलण्याची त्यांची हातोटी, मनोविकार व विचार चेहऱ्यावर व्यक्त करण्याचे त्यांचे कसब, इत्यादि नाट्य-