Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/151

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३३
भाग २ रा.

    त्याप्रमाणें श्रीविष्णूचा वर मिळतांच कवितादेवीचें स्वरूप पार बदललें. तिचें तें मंद सुहास्य, सौम्यगति व सोज्वल रूप नष्ट झालें! आतां तिनें केस पाठीवर मोकळे सोडिले, कपाळीं मळवट भरून, पदर घट्ट बांधून एका हातांत प्रज्वलित केलेली दिवटी धरून तांडवनृत्य करण्यास प्रारंभ केला. नंतर कवितादेवी हिमाचलापासून मुंबापुरीकडे धांव घेत निघाली. येतयेत वऱ्हाड प्रांतांत येतांच बोलू लागली: "आतां आलें मला आवसान ॥ हाणाहाण ॥ दाणादाण ॥ रानोरान ॥ करितें जाण ॥ आलें मला अवसान ॥" बसबस! आतां मी माझा पुत्र केव्हां डोळे भरून पाहीन असें मला झालें आहें, असें ह्मणत कवितादेवी क्षणार्धात मुंबापुरींत येतांच 'मात्रदेवता समान, नसे कोणी जगांतरीं' असें तारस्वरानें ह्मणत ह्मणत कवितादेवीचा प्रियपुत्र तिच्यापुढे येऊन त्यानें तिला अगोदर बंधमुक्त केलें व ह्मणाला, 'माते, तुला इतके दिवस मी बंदीत ठेविलें अँ? खरोखरच कोण सुस्ती ही! "मेषपात्र झालों । मी इच्या अहारी पडलों ॥" तें ऐकून कवितादेवी पुत्रकाचा हात धरून ह्मणाली, "निशींदिनीं प्रिय सखया तूं । मनांत कां झुरतोस" बाळा, मातेची बंधनें ज्यानें तोडिलीं तोच खरा पुत्र ! बालका, आतां मला तें स्वर्गातलें अमृतपानसुद्धां नकोरे! तुझ्याबरोबर राहून "लईबेस झुणकान् कांदा भाकूर ॥ खाउनशान देईन ढेकूर ॥" असें म्हणून आपल्या पोटाशीं आपल्या पुत्राला घट्ट धरून ती पुढें ह्मणाली, "बाळा रोमांकिता, माझी तनू ॥ थर थर थर थर थर थर थर थर्र थर्र थर्र ॥ अशी झाली आहे ! आतां ऊठ, चोहीं राष्ट्रांत फीर. पुत्रका, माझा दिग्विजय कर! हें शुभवर्तमान गाजीव ! तूं आपल्याप्रमाणें कित्ता घालून हजारों भक्कांचा समुदाय उत्पन्न कर. हा वेळपर्यंत कवितादेवी सगुणरूपानें आविर्भूत झाल्याची बातमी हां हां ह्मणतां सर्वत्र पसरली; व अनेक कविवर्य आपापलीं चोपडीं घेऊन त्या ठिकाणीं प्राप्त झाले व देवांच्या सभोंवतीं स्थापन्न झाले ! नंतर देवी सर्वास ह्मणाली, "मी तुह्मां सर्वांना वर देतें, श्रवण करा;