पान:मराठी रंगभुमी.djvu/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२०
मराठी रंगभूमि.


पेक्षांही चांगलें होई. शिवाय आण्णापेक्षां डोंगरे यांनीं गाण्यावर थोडे अधिक परिश्रम केले असल्यामुळे तिकडूनही त्यांचें आधिक वजन पडे. गायनाखेरीज उत्कृष्ट अभिनय करण्याचा गुणही रा. डोंगरे यांच्या आंगीं होता. या सर्व कारणांनीं या वेळीं डोंगरे यांच्या नाटकमंडळीची चोहोंकडे ख्याति होऊन त्यांना पैसाही पुष्कळ मिळाला; व त्यांची मानमान्यताही पुष्कळ ठिकाणीं झाली. एकदां वेडरबर्नसाहेब अहमदनगर येथें असतां मेजवानीच्या प्रसंगीं करमणुकीकरितां रा. डोंगरे यांच्या कंपनीस मुद्दाम बोलावून नेऊन त्यांचे प्रयोग करविले, व त्यांबद्दल त्यांस चांगलें इनामही दिलें.
 रा. डोंगरे यांनीं वर्षभर पेटी न लावितां तंबो-यावरच नाटकांचे प्रयोग केले; व त्यामुळे त्यांच्या नाटकांतील लहानसान गाणा-या पात्रांनासुद्धां सुरांत गाणें भाग पडत असल्यामुळे गायनकलेची थोडीबहुत तरी माहिती होत असे; व अशीं पात्रें दोन तीन वर्षे त्या नाटकांत मुरून बाहेर पडलीं तर इतर नाटकांतल्याप्रमाणें उपाशी मरण्याची पाळी न येतां गाण्यावर त्यांना पांच दहा रुपये तरी मिळवितां येत असत. हल्लीं जिंकडे तिकडे नकली संगीत झाल्यामुळे नाटकांतील पात्रांस तंबो-यावर गातां येण्याची मुश्कीलच, मग नाटकांतून बाहेर पडल्यावर त्या धंद्यावर पांच चार रुपये मिळतील ही आशा करणेंही व्यर्थ आहे. असो; डोंगरे यांच्या नाटकांत शास्त्रशुद्ध संगीत असल्या-