Jump to content

पान:मराठी रंगभुमी.djvu/२७९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२४५
भाग ३ रा.

घेणे, भक्षण, निद्रा, स्नान आणि शौचमुखमार्जनादि प्रातःक्रिया रंगभूमीवर प्रेक्षकांदेखत करणे हे आर्यनाट्यशास्त्रकारांच्या मतें निषिद्ध आहे. आणि चांगले नाटककर्ते या नियमांचे उल्लंघन सहसा करीत नाहीत. शाकुंतलाचे तिसऱ्या अंकांत दुष्यंतराजा शकुंतलेच्या ओष्ठावरील मधूचा आस्वाद घेण्याकरितां पुढे सरसावतो न सरसावतो इतक्यांत कवीने मोठ्या युक्तीने हात आखडून अधिक प्रसंग टाळला आहे. वेणीसंहारांत द्रौपदीची वेणी धरून दुःशासनाने तिला राजसभेत फरफरा ओढीत आणलेली दाखविली आहे आणि त्यामुळे संस्कृत नाट्यशाखाच्या नियमाचा अतिक्रम झालेला दिसतो खरा. तथापि, तसें केलें नसते तर प्रेक्षकांच्या मनांत दुःशासनाविषयीं अप्रीति अथवा धिःकार आणि द्रौपदीविषयीं अनुकंपा व्हावी तशी उत्पन्न न होऊन नाटककर्त्याचा हेतु निष्फळ झाला असता; ह्मणून त्या ठिकाणीं झालेला नियमतिक्रम क्षम्य आहे. विद्धशालभंजिकेतही निद्रा आणि विवाह असे दोन प्रसंग रंगभूमीवर घडवून आणिले आहेत. हे नाटकशाखाचे विरुद्ध आहे असे स्पष्टपणे ह्मणण्यास कांहीं प्रत्यवाय दिसत नाही. भवभूति, कालिदास, श्रीहर्ष, शुद्रक वगैरे संस्कृत कवींनी असा नियमभंग केल्याची उदाहरणे फारच क्वचित् सांपडतील. आधुनिक नाट्याचार्यांनी तरी सदर्हू नियमांचा अतिक्रम कां करावा ते कळत नाहीं. हे नियम फार सूक्ष्म विचाराअंतीं आणि समाजाचें नीतिदृष्ट्या हित व्हावें व कोमल अंतःकरणाच्या स्त्रीपुरुषांची मनें असभ्यपणाच्या गोष्टी पाहून दूषित होऊ नयेत अशाकरितां करून ठेविले आहेत. परंतु नाट्यकलेचा उद्धार करण्यासाठी अवतीर्ण झालेल्या आधुनिक कवींना हा सगळा पोरकटपणा वाटून त्यांनी या नियमांचा अतिक्रम करण्याचा जणू काय विडाच उचलिला आहे; फार काय, पण मुखमार्जन व वस्त्रांतर करणे व शौचास जावयास निघणें व लघुशंकेसाठी बसणे असले किळसवाणे प्रकारसुद्धां प्रेक्षकांसमोर दाखविण्यास त्यांना शरम वाटेनाश झाली आहे! आणि प्रेक्षकांनाही असे प्रकार बघण्यांत मौज वाटते!