पान:मराठी रंगभुमी.djvu/२३८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०४
मराठी रंगभूमि.


निरनिराळे आवाज, उंचनीच स्वर, गाण्याची ढब, वगैरे जे गुण गायकाच्या अंगी यावयाचे त्यांचा लोप होऊन संगीत नाटकें म्हणजे एक प्रकारची थट्टाच होऊन बसली आहे.
 (८) कित्येक पात्रांना गाण्याची छाप कशी पाडावी हे समजत नसल्यामुळं आरंभीं पात्र पडद्याबाहेर येत तें आंतून तान मारीतच येते, व त्यामुळे तें काय पद्य म्हणतें हें मुळींच उमगत नाही. बरें, ही तान तरी सुरांत असावी, पण तसेही नाही. वास्तविकपणे तान म्हणजे संगीताची अथवा गायनकलेची शेवटची पायरी आहे. ती बेताबातानें व अखेरअखेरच चढली पाहिजे. ती आरोहावरोह संभाळून जो उत्तम रीतीनें मारील तोच गाण्यांत पुरा वाकबगार झाला असे समजलें पाहिजे. तसेच आरंभीं साधे गाणे होऊन शेवटीं शेवटीं तानेची करामत करून दाखवावयाची, अशी त्या शास्त्रामध्ये निपुण असलेल्यांची वहिवाट आहे. ही वहिवाट सोडून केव्हां तरी व कशी तरी तान मारून कित्येक पात्रे नाटकाची अशी घाण करितात कीं, मार्मिक प्रेक्षकांना त्याचा कंटाळाच येतो.
 (९) अलीकडे कित्येक संगीत नाटकांतून प्रारंभ मंगलाचरणाचे वेळ सगळीं पात्रें प्रेक्षकांना दाखविण्यांत येतात. हा प्रकार पार्शी नाटकाच्या अनुकरणानेंच सुरू झाला आहे. पण आमच्या मतें तो गैर आहे. याचें