पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निबंध लेखन या लेखात मराठी निबंधाच्या रचनेचा व स्वरूपाचा विचार करावयाचा आहे. सर्वसाधारणपणे निबंधाचे पुढीलप्रमाणे प्रकार कल्पिले जातात. १) वाङमयीन २) कथनात्मक ३) वर्णनात्मक ४) चरित्रात्मक ५) वैचारिक ६) कल्पनाप्रधान या निबंधप्रकारांपैकी एक विषय लेखनासाठी विचारला जातो. निबंधासाठी वाचन, निरीक्षण, मनन आणि स्मरणाची गरज असते. निबंध लेखनात शुद्धलेखनालाही महत्त्व असते. निबंध लेखनापूर्वी निबंधाचा आरंभ, त्याच्या अंतरंगातील, गाभ्यातील मुद्दे आणि शेवट यांची विद्यार्थ्यांनी मनाशी योजना केली पाहिजे. आपल्या मुद्दयाच्या स्पष्टीकरणासाठी विद्यार्थ्यांनी काही उदाहरणे, अवतरणे, म्हणी यांचा सुसंगत वापर करण्याची तयारी ठेवावी. निबंधाचा आरंभ, निबंधातील महत्त्वाचा प्रत्येक मुद्दा आणि शेवट यांचे स्वतंत्र परिच्छेद करावे. निबंधाची सजावट व मांडणी आकर्षक असावी व विषयविवेचन आरंभापासून शेवटपर्यंत मुद्देसूद असले पाहिजे. आकर्षक आरंभ म्हणजे वाचकांना निबंधवाचनासाठी सतत उत्सुकता निर्माण होत राहील, अशी कुतूहलजनक रचना असली पाहिजे. विद्यार्थ्यांनी विषयविवेचनाचे सोयीनुसार ४ - ५ भाग पाडून लेखन करावे, यालाच परिच्छेद लेखन म्हणतात. निबंधाच्या भाषेत सुबोधता असावी. त्यात शब्दावडंबर नसावे. सहजता असावी. सुभाषिते, म्हणी, वाक्प्रचार, कोट्या, अलंकार, दृष्टांतांची योजना स्वाभाविक व चपखल करावी. ५६