पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या आणि इतर लोकांच्याही संबंधात शुद्धलेखन हा एक चिंतेचा विषय झाला आहे. न्हस्व, दीर्घ, अनुस्वार, विरामचिन्हे, जोडाक्षरे अशा सर्वच प्रकारांमध्ये अनेक प्रकारच्या चुका आढळून येतात. संस्कृत भाषेचे अज्ञान आणि गेल्या काही वर्षात झालेली शुद्धलेखनाची उपेक्षा यांमुळे अशी परिस्थिती उत्पन्न झालेली दिसते. मध्यंतरी शुद्धलेखनाच्या नियमांमध्ये काही बदल झाले. त्याचीही अनेकांना माहिती दिसत नाही. या पार्श्वभूमीवर डॉ. भा. व्यं. गिरधारी यांनी लिहिलेली शुद्धलेखना- संबंधीची ही छोटेखानी पुस्तिका आणि त्याला जोडलेले अन्य लेखन- संदर्भातील मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शुद्धलेखनासंबंधी विस्तृत विवेचन करावे, अशी या लेखनामागे अपेक्षा नाही. नित्यांच्या व्यवहारात लेखन करीत असतांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन करावे हा या प्रयत्नामागचा हेतू दिसतो. त्यामुळे विशेष विस्तार न करता अगदी मोजक्या पण वेचक शब्दांत त्यांनी सूचना दिल्या आहेत. प्रत्येक वेळी निरनिराळ्या प्रकारची उदाहरणे दिली आहेत. कोणत्या प्रकारच्या चुका वारंवार होतात, ते लक्षात घेऊन त्यानुसार मार्गदर्शन केले आहे. डॉ. गिरधारी मराठीचे प्राध्यापक असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांचे लेखन त्यांच्या नजरेखालून जात असल्यामुळे नेमके काय आणि कसे सांगावे याची योग्य कल्पना, त्यांना आहे. काही नित्योपयोगी शब्दांच्या याद्याही त्यांनी पुरवल्या आहेत. अशुद्ध उतारे शुद्ध करून दाखवले आहेत. सार, वृत्त, निबंध, आस्वाद इत्यादी महत्त्वपूर्ण लेखांची पुस्तीही त्याला जोडली आहे. त्यामुळे आकाराने लहान असले तरी सर्वांगपरिपूर्ण असे स्वरूप या पुस्तकाला आले आहे. या विषयाचा अधिक अभ्यास करू इच्छिणारांसाठी त्यांनी काही पुस्तकांची नावेही सुचवली आहेत. डॉ. गिरधारी यांचा हा प्रयत्न कौतुकास्पदच म्हणायला हवा. त्यासाठी त्यांनी पुष्कळ कष्टही घेतलेले दिसतात. विद्यार्थ्यांनी व मराठीच्या सर्वच अभ्यासकांनी या पुस्तकाचा नोट उपयोग करून घेतला व त्यांच्या लेखनात थोडीफार प्रगती झाली तर लेखकाचे प्रयत्न सफल झाले, असे म्हणता येईल. सहा त्र्यं. गं. गायधनी