Jump to content

पान:मनू बाबा.djvu/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
ज मी न दा र व
त्या चे दो न मु ल गे

♣ * * * * * * ♣








 रायगावात दिगंबराय हा मोठा जमीनदार होता. सारा गाव त्याला मान देई. गावात काही तंटाबखेडा झाला, तर त्याचा निवाडा दिगंबरराय करायचे. दिगंबररायांना दोन मुलगे होते. मोठ्या मुलाचे नाव संपतराय व धाकट्याचे नाव ठकसेन. दिगंबररायांची पत्नी मरण पावली होती. घरात आचारी स्वयंपाक करी. घरात सारी अंदाधुंदी असे. सारा पसारा. घरात स्त्री असेल तर व्यवस्था रहाते. स्त्रियांशिवाय घराला शोभा नाही. सारे ओसाड, उदास व भगभगीत दिसते.

 "संपत, तू आता लग्न कर. त्या दलपतरायांची मुलगी इंदुमती तुला साजेशी आहे. त्यांचं घराणंही मोठं खानदानीचं आहे. इंदुमतीचंही तुझ्यावर प्रेम आहे. तिच्या पित्यानं तिचं कधीच लग्न केलं असतं, परंतु तिचं तुझ्यावर प्रेम आहे असं त्याला कळलं. त्यामुळं तो थांबला आहे. संपत, तू का नाही लग्नाला तयार? वेळीच सारं करावं. तुझी पंचविशी उलटून गेली. माझं ऐक. मीही आता म्हातारा झालो आहे. मरणापूर्वी घराला कळा आलेली पाहू दे. घरात सून आली म्हणजे घराला शोभा येईल, घरात आनंद येईल, व्यवस्थितपणा येईल. हल्ली घर म्हणजे धर्मशाळा वाटते. घरपणा स्त्रियांशिवाय नाही. करतोस का लग्न?" पित्याने विचारले.

 "बाबा, थोडे दिवस आणखी जाऊ देत. इंदुमतीचं माझ्यावर प्रेम आहे ही गोष्ट मला माहीत आहे. ती आशेनं आहे. तिची आशा पूर्ण होईल. परंतु काही दिवस थांबा. मी तुमच्या शब्दांबाहेर नाही. खरोखर नाही" संपत म्हणाला.

जमीनदार व त्याचे दोन मुलगे * १३