मनूबाबाच्या मनात किती तरी विचार आले. त्याने ती फुले सोनीच्या केसांत घातली. जणू वनदेवतेची मुलगी अशी सोनी दिसू लागली. त्याने तिच्याकडे प्रेमाने पाहिले. तिला उचलून घेतले. तो सोनीला घेऊन घरी आला.
"सोने, बाहेर गेलीस तर बघ. त्या कोळशाच्या खोलीत कोंडून ठेवीन. ठेवू कोंडून? ठेवू?" असे म्हणून त्याने त्या लहान मुलीला त्या कोळशाच्या बळदात थोडा वेळ ठेवले. ती रडू लागली. त्याला दया आली. त्याने तिला जवळ घेतले. तिचे डोळे त्याने पुसले. तिच्या पायांना काळे लागले होते ते त्याने धुतले. "नाही हो, माझी बाळ ती! नाही हो ठेवायची कोळशात. माझी सोनुकली ती." असे म्हणून त्याने तिचे मुके घेतले.
सोनीला खेळण्यांचा तोटा नव्हता. वाटेल ती वस्तु तिला चाले. मनूबाबांची कात्री - त्या कात्रीवर तिचे फार लक्ष असे. एके दिवशी तिने ती कात्री पळविली. सुताच्या गुंड्यांचे ती तुकडे करीत होती. सोनी कशाशी खेळत आहे हे पाहाण्यासाठी मनूबाबा गेले, तो सोनी सुताचे धागे तोडीत आहे असे त्यांना दिसले.
"तुला कात्री घेऊ नको सांगितलं तरी पुन्हा घेतलीस? हात कापेल ना! त्या कोळशाच्या बळदात ठेवू?" त्याने विचारले.
"हं ठेवा बाबा. त्या कोळशाच्या खोलीत मला ठेवा. मग तुम्हांला मी हाका मारीन. तुम्ही मला घ्याल. माझे काळे पाय धुवाल. ठेवा ना या खोलीत." ती सोनुकली म्हणाली.
मनूबाबाला हसू आले. ज्या वस्तूची दहशत तो दाखवू पाहात होता, तीच वस्तू सोनीला गमतीची वाटत होती. सोनीला खोटी भीती घालायची नाही असे त्याने ठरविले. मोकळेपणाने सोनी वाढू दे.
त्याने सोनीसाठी मुद्दाम सुंदर कापड विणले. त्याचे कपडे तिच्यासाठी करण्यात आले. किती सुंदर दिसे सोनी त्या कपड्यात. सोनीसाठी तो चांगली भाजी करी. तिच्यासाठी दूध घेई. सोनीच्या भातावर तूप वाढी. तिच्या पोळीला तूप लावी. मनूबाबाचे पैसे आता शिल्लक पडत नसत. पूर्वी पैसे भराभर साठत. मोहरा जमत. परंतु आता? पूर्वी पैशांना हेतू
सोनी*३९