पान:मनू बाबा.djvu/34

विकिस्रोत कडून
येथे जा: सुचालन, शोध
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


दिवसापासून रामू बाहेर जाईनासा झाला. काहीतरी असं करावं लागतं." साळूबाई अनुभव सांगत होती.

मनूबाबा मागावर बसले होते. सोनी जवळच खेळत होती. सुताच्या गुंड्यांशी खेळत होती. परंतु तिकडे रस्त्यावरून एक बैलगाडी जात होती. सोनीने बैल पाहिले. ती दाराकडे वळली. ती घरातून बाहेर पडली. ती लांब गेली. मनूबाबांच्या एकदम लक्षात आले. सोनी कुठे आहे? ते इकडे तिकडे पाहू लागले. ते घाबरले. त्यांनी झोपडीच्या सभोवती पाहिले. त्यांचा जीव घाबरला. छाती धडधडू लागली. कोठे गेली सोनी? 'सोने. सोने!' -ते हाका मारू लागले. सोनी ओ देईना, नाचत पुढे येईना. त्यांना झोपडीच्या उत्तर बाजूला असलेला तो खळगा आठवला. त्या खळग्याकडे तर नाही ना गेली? पडली तर नसेल तेथील चिखलात? ज्या दिवशी मनूबाबांचे सोने चोरीस गेले होते, त्या रात्रीच्या पावसात तो खळगा कोसळला होता. तो खळगा त्या दिवशी बराच भरून गेला होता. गावातील पावसाचे सारे पाणी तेथे जाई. तेथे दलदल असे. मनूबाबांचे मन दचकले. ते धावपळ करीत होते. इतक्यात त्यांना सोनी दूर दिसली.

"सोने, सोने!" म्हाताऱ्याने हाक मारली.

सोनीचे लक्ष नव्हते. ती रानफुले गोळा करीत होती. पिवळी, जांभळी फुले.

"सोने, सोने!" असे म्हणून मनूबाबाने तोला एकदम उचलून घेतले. तिचे पटापट मुके घेतले. तिचे गोरे गोरे गाल लाल झाले होते. सोनी मनूबाबाच्या कानांत फुले ठेवीत होती. सोनीला घेऊन तिथे तो म्हातारा उभा होता. त्या जागेकडे पाहात होता. ती पवित्र जागा होती. येथेच सोनीच्या आईने शेवटचे अनंतशयन केले होते. येथेच भू-मातेच्या मांडीवर सोनीच्या आईने आपले डोके ठेवले होते. येथेच 'मा मा मा मा' करीत लहानगी सोनी आईला उठवीत होती. आईने घ्यायला यावे म्हणून रडत होती. आज सोनी येथेच येऊन बसली. तेथेच रमली. त्या जागेवरची फुले गोळा करीत राहिली. त्या मातेचा का आत्मा तेथे होता? त्या मातेच्या डोळ्यांतील अश्रूंची का ती फुले होती!

३८*मनूबाबा