पान:मनतरंग.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाले आणि एक तपाच्यावर वर्षे त्याभूमीत घालवली तरी त्यांच्या मनात पुरलेला 'भारत' एखादा भारतीय भेटला की वर उसळून येतो. तसेच झाले. गप्पांच्या ओघात, गाडी नेमक्या जागी लावून ठेवताना अशोक शेजारील यंत्रात वेळ नोंदवून नाणे टाकायला विसरला. जेमतेम शंभर पावलेच पुढे गेलो असू. अशोकच्या चूक लक्षात आली आणि तो अक्षरश: गाडीकडे धावला. पण गाडीच्या बॉनेटवर पंधरा डॉलर्स दंडाची पावती ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी दंडाची रक्कम न भरल्यास दर दिवशी दहा डॉलर्स उशीराचा दंड भरावा लागेल असा सज्जड दम त्यावर लिहिला होता. पोलिसमामा अक्षरशः अदृश्य मानवासारखे वावरतात इथे. आपल्याला ते दिसत नाहीत पण आपण नि आपल्या चुका मात्र त्यांना ठसठशीत दिसत असतात.
 जिवाला डसून जाणारा समुद्र बँकाँकचा... पटायाचा. रात्रीच्या झगमगाटात कण्हणारा. पटायाच्या किनाऱ्याने आम्ही पायी हिंडत होतो. सत्तरी पुढचे तरुण आणि परिस्थितीच्या भोवऱ्यात गरगरणाऱ्या तेरा-चौदाच्या त्यांच्या जोडीदारिणी. एकमेकात मिसळून चालणारे ते. भडकपणे रंगलेल्या डोळ्यातून आक्रंदणारा वैराण समुद्र. अर्धुक्या उजेडात देहाचा बाजार मांडून लेकरांच्या पोटात दोन घास घालण्यासाठी ठुमकणाऱ्या उदास आया. रात्रभर तो झगझगणारा किनारा सतावीत होता. शेवटी,
 कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ।
 असे ठामपणे सांगणारी भारतीय संस्कृती दक्षिण अशियाभर पसरली आहे. तरीही पटायाचा किनारा असो, किंवा गोवा-केरळचा चंदेरी किनारा असो, त्यात थरथरणारी प्रतिबिंबे असतात. उदास देहस्विनींची. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांच्या संगमावर ती तेजस्विनी... मनस्विनी 'कन्या'... कन्याकुमारी जग जन्मल्यापासून उभी आहे. वाट पाहते आहे, त्या अंबराची... आकाशाची.जे तिच्या अंतरीच्या शिवत्वावर भाळून तिला आपल्यात सामावून घेईल. तो किनारा अजूनही तिला सापडलेला नाही.

■ ■ ■

मनतरंग / ८८