पान:मनतरंग.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनुभवला तो उंबरगावचा. उतरत्या घनदाट सुरूच्या झाडांची हिरवाई, लाटांच्या पापण्यात साठवीत ऐसपैस पहुडलेला अरबी समुद्र. किनाऱ्यावरची चंदेरी वाळू पाण्यात मिसळल्याने समुद्राचा रंग रुखाफिका दिसायचा. अर्थात ऐन उन्हाळ्यात; आम्ही आत्याकडे सुट्टीत जायचो तेव्हा.
 एकतीस डिसेंबरची रात्र सरत चालली आहे. एक जानेवारीची पहाट थोड्याच वेळात होईल, अशी अधमुरी वेळ. कन्याकुमारीच्या टोकावर आम्ही उभे. समोर निळाभोर हिंदी महासागर, डावीकडे गुलाबी निळा बंगालचा उपसागर आणि उजवीकडे फिकट निळा अरबी समुद्र. एकाच वेळी बुडणारा चंद्र आणि उगवणारा सूर्य. पहाटेच्या अधुक्या उजेडात अनुभवलेला तो समुद्र कसा विसरता येईल?
 मद्रासजवळील महाबलीपुरमचा खडकाळ किनारा त्या किनाऱ्यावर शिल्पकलेचा अत्युत्कृष्ट नमुना असलेली सात मंदिरे हजारो वर्षांपासून उभी आहेत. त्यातील सहा पाण्याखाली गेली असून शेवटचे लाटा झेलीत उभे आहे. तेही एखाद्या शतकात पाण्याखाली जाईल. त्या मंदिराच्या पायऱ्यावर लाटांचे तुषार झेलीत काढलेली अमावस्येची रात्र, माझ्या मनात बंगालच्या उपसागराच्या आठवणींनी भिजवून ठेवली आहे आणि न्यू फाऊंडलंड किनाऱ्यावरील अटलांटिक सागरात पाय बुडवत असताना मनाला बजावले की, हा मी अनुभवलेला चौथा समुद्र...
 पाचवा समुद्र पाहिला नि अनुभवला तो पॅसिफिक महासागर. उसळ्या मारणारा आणि घनगर्द निळ्या रंगाचा. पॅसिफिक सॅनफ्रैंसिस्कोचा, लॉस एंजिल्सचा आणि व्हँकुवरचा. तीनही एकच आणि तरीही वेगवेगळे.
 पण पॅसिफिकची आठवण लक्षात राहिली व्हँकुवरची. काही माणसं पहिल्यांदा भेटली तरी वाटतं की रोज न रोज ती भेटतात. वर्षानुवर्षांचा संवाद आहे. जणू अंतस्थ भावरेषा जुळालेल्याच असतात. तसेच आम्हां दोघांचे आणि अशोक गर्टुडचे झाले. आल्याक्षणी पॅसिफिकच्या किनाऱ्यावर वेळ काढून जायचे ठरले होतेच.
 तिथली दुपारी रेशमी. ओढणी अंगावर पांघरावी तशी असते गर्टूड नोकरीवर गेलेली. साशा आणि शानू दोघीजणी शाळेत गेलेल्या. आम्ही तिघे समुद्रावर निघालो. भारतात वाढलेले भारतीय कॅनडात जाऊन 'इंडो कॅनडियन'

समुद्राच्या काठाने... / ८७