पान:मनतरंग.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जांभळ्या, निळ्या रानफुलांची दाटी, गालातल्या गालात खुदखुदणारी. मधूनच रानकपाशीची पिवळीजर्द थोराड फुले. ही रंगबावरी किमया पाहताना आमच्यातला एकजण दर पाच मिनिटाला जीप थांबवून कॅमेरा सरसावीत असे. पण फोटो मात्र एकही नाही. शेवटी कॅमेरा बंद करून, तो बॅगमध्ये बंद करतानाचे त्याचे शब्द,
 "फोटो तरी कोणकोणते नि किती काढावेत ? त्यापेक्षा भवतालचे सारे नजरेत साठवून घ्यावे. अंतरात गोंदवून घ्यावे. डोळे मिटून मनाचे बटन दाबले की या सुंदर आठवणींच्या चित्रांची माळ नजरेसमोरून आपोआप थिरकत जाईल."
 वळणे घेत घेत आम्ही माथ्यावर पोचलो. ज्वारी, मक्याची लहान लहान शेते दिसू लागली. समोरून एक पोरसवदा अदिवासी बाई, कडेवर अत्यंत अशक्त, पांढुरके, काटकुळ्या हातापायांचे मूल घेऊन शेतात शिरताना दिसली. दुसऱ्या क्षणी उतरत्या छपराच्या कौलारू झोपड्या नजरेच्या टप्प्यात आल्या.
 हे गाव दोन वर्षांपूर्वी विधानसभेत गाजले. मुलांच्या कुपोषणामुळे. गाव कोरकूवस्तीचे. दोन गवलांची... गवळ्याची घरे आणि एक गोंड अदिवासीचे. बाकी कोरकूंची गावात सातवीपर्यंत शाळा आहे. शाळेत गेलो तर दोन-तीन शिक्षक शाळेत होते. बाकीचे मुलांना गोळा करण्यासाठी डांगात गेले होते. कोरकूची घरे समांतर ओळीत, बांबूच्या भिंती. आत जाण्यासाठी जेमतेम तीन फुटी दरवाजा. खिडकीची बात नसेच. मात्र प्रत्येक घरात दगडी जाते. झोपडीला लगटून ओटा आणि अंगण. शेणाने सुरेख सारवलेले. भिंतीवर तांदूळपीठ आणि लाल मातीच्या चित्राकृती. मनाला हजारो वर्षे मागे घेऊन जाणाऱ्या.
 पहिल्या झोपडीत शिरलो. तीन महिला बसलेल्या. मी नाव विचारले. त्या नुसत्याच हसत होत्या. आमच्या सोबत रमेश धुर्वे नावाचा आदिवासी शिक्षक होता. त्याने 'विहीइमा...विहीइमा' असे दोन तीनदा सांगितले. विहीइमा म्हणजे सांगा, उत्तर सांगा. उत्तर आले.
 "सुमुरतीजी... मीरा... सांती"
 चाळिशीची कोरकू स्मृती, तिशीतल्या मीरा नि शांती समोर होत्या. यांच्या घरातील पुरुष मोठ्यांच्या घरची जनावरे चारतात. एका जनावराचे वर्षाला १२ किलो धान्य... कोदु कुटकी...मिळते. या भागात पेरण्यासाठी सपाट जमीन आहे कुठे ? या भागात कोदूची भाकरी व कुटकीचा भात खातात. हे कुठेही उगवणारे तृणधान्य आहे.या भागातल्या अदिवासींना व्याघ्रप्रकल्पाच्या सीमेवरील

मनतरंग / ६०