पान:मनतरंग.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खूप छान वाटलं."
 मग मीच आग्रह केला. "अगं सांगू द्याना. मलाही आवडेल तुमचे अनुभव ऐकायला."
 "आम्हाला मुलांची मुळीच भीती वाटली नाही. सगळीच मुलं वाईट नसतात."
 अनोख्या अनुभवाने मुली अगदी तरारून गेल्या होत्या. मुलींचे महाविद्यालय, भवतालच्या खेड्यांमधून रोज एस.टीने ये-जा करणाऱ्या मुलींची संख्या भरपूर असूनही खेड्यातील लेकींना दडपूनच वावरावे लागते.

"नको साळा नको पाटी
काय कराचं लिहिनं
बाया बापड्यांचं माये
चुली म्होरं शानपन
गाय दावनीला बरी
हवा मंडप येलीले
मागं...म्होरं नगं पाहू
ठेव नदर भुईले..."

 हा धडा आजही गिरवावा लागतो. आणि तो गिरवला तरच शाळेत वा महाविद्यालयात जाण्याची परवानगी मिळते. मुलींनी शिकायला हवे हे ग्रामीण भागातील पालकांना पटले आहे. परंतु मुलींच्या सुरक्षिततेची हमी त्यांना वाटत नाही. रिंकू पाटील सारखी अनेक प्रकरणे ऐकण्यात, वाचण्यात येतात आणि मग जगावरचा विश्वास उडून जातो. घरातल्या लेकींना गावात आहे तेवढे शिक्षण द्यायचे आणि लगीन जमेपर्यंत घरातच कोंडायचे ही सुरक्षित रीत सर्वत्र पाळली जाते. पण महिला महाविद्यालय तालुक्याच्या गावाला निघाल्यावर वातावरण बदलले. घरातल्या लेकीच नाही तर सुनाही शिकू लागल्या. महाविद्यालयात होणारी विविध व्याख्याने, चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडास्पर्धा यांच्याद्वारे त्यांच्यातला आत्मविश्वास वाढू लागला. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे सामाजिक जाणीव वाढली. समाजाचे प्रश्न कळू लागले. वाचनाचा, कामाचा उत्साह वाढला. जवळच्याच शहरापासून ५/१० किलोमीटर अंतरावरच्या खेड्यात 'एन.एस.एस.' चे शिबिर

रानफुलं नि मोकळं आभाळ / ४९