पान:मनतरंग.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पूर्वी चेन्नईपासून अगदी जवळ असलेल्या महाबलीपुरमचे समुद्रात बुडालेल्या मंदिरांचे अवशेष पाहायला गेलो तेव्हा तेथील खूप बुढ्या ख्रिश्चन गाईडने माहिती दिली होती की, पूर्वी ज्यांना देहदंडाची शिक्षा दिली जाई अशांना एक पर्याय खुला असे. बोटीत पाणी, धान्य भरून परिवारासह त्यांना समुद्रात सोडून देत. अनेक बोटी समुद्रात बुडाल्या तर काही वेगवेगळ्या किनाऱ्यांना लागल्या. संस्कृती...वेशभूषा, अन्न, रीतिरिवाज, महाकाव्ये, आराध्य दैवते, कला त्या त्या भूभागात नेली. थायलंडची बुद्ध मंदिरे आणि संस्कृत शब्दांचा प्रभाव पाहून ते आठवले. मसाल्याचे पदार्थ, अननस, नारळ, लिंबू, केळी, आंबे आदी रसदार फळे यंची रेलचेल असलेला हा समुद्ध प्रदेश पाश्चात्त्यांच्या मनात भरला. इथेही त्यांनी आपल्या भोगवादी संस्कृतीचे इंजेक्शन टोचलेले आहे. शेती हा व्यवसाय नाहीसा होत चालला असून 'टुरिझम' हा व्यवसाय तेजीत आहे. एकेकाळी स्त्रिया अन्ननिर्मितीचे आणि वस्त्र विणण्याचे काम करीत, घरातील मुलांना आणि वयस्कांना सांभाळणाऱ्या स्त्रियांना आज अन्नासाठी, मुलांच्या पोटापाण्यासाठी व शिक्षणासाठी घराबाहेर पडावे लागले आहे. पटायात शिरताना विद्यापीठाची भव्य इमारत दिसली. 'विद्यापीठ' कसले ? तर अंगमर्दन...मसाज करण्याची कला शिकविणारे !!
 पटायात पोचतातच मी, सीमा साखरे, चंद्रकला भार्गव अशा दहाबाराजणी आमच्या हॉटेल शेजारच्या 'मसाज केंद्रात' गेलो. तर खालच्या खोलीत दाटीवाटीत पन्नास बायका बसलेल्या. त्या दुपारच्या पाळीच्या. तीन पाळ्यांमध्ये हा व्यवसाय चालतो. ३० मिनिटांच्या मसाजसाठी तीनशे रुपये मोजायचे. एका निरुंद पण लांबट खोलीत तीन-तीन फुटांवर पडदे बांधून दहा आडोसे केलेले. एका आडोशाआड एकाचे अंगमर्दन करणारी एक कुशल स्त्री. मसाज तेलाशिवाय. एकतर आम्हां पन्नाशी नि चाळीशी पल्ल्याडच्या बायका पाहून त्या धास्तावल्या. कारण मसाज करून घ्यायला येणार परदेशी पुरुष. आम्ही खोलीत जाताच ते पडदे बाजूला सारून टाकले आणि त्यांच्याशी दोस्ती करून गप्पांना सुरुवात केली. आम्ही त्यांच्याशी बोलण्यासाठीच आलो होतो. भाषा खाणाखुणांची. दोघींना थोडेसे इंग्रजी कळत होते. त्या आठपैकी दोघी हुंडा जमवण्यासाठी, चौघी मुलांचे शिक्षण आणि पोटासाठी आणि एक दुसरे कामच उपलब्ध नसल्याने ही नोकरी करीत होत्या. पुरुषांना मसाज करण्यात

मनतरंग / ३८