पान:मनतरंग.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चैन.. चूष.. मज्जा. एंजॉयमेंट यात झाले की तृप्तीची निवान्त ढेकरही देता येत नाही.
 महंमद पैगंबर साधी भाकरी खात व पाणी पीत. महात्माजी अधिक पदार्थ जेवणात घेत नसत. एका धनवान गृहस्थाकडे त्यांना भोजनाचे आमंत्रण होते. भोजनापूर्वी घरातील सर्व लहान थोर मंडळी त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी एकत्र आली. त्यांची नजर सतत कुणालातरी शोधत होती. जेवणात तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ होते. आम्हां भारतीयांचे भोजन मोठे सुरस असते. नुसत्या चटण्यात शंभर प्रकारच्या असतात. तर जेवणाचा पहिला घास घेण्यापूर्वी महात्माजींनी चौकशी केली, की या घरात स्त्रिया नाहीत का? त्या कुठेच दिसत नाहीत. यजमानांनी आत निरोप पाठवला आणि आजीपासून ते नातीपर्यंत...लेकी, सुना अनेकजणी भोजनकक्षात आल्या.
 महात्माजींनी विचारले की, 'तुम्ही भगिनी कुठे होता?' भगिनींनी उत्तर दिले, 'तुम्ही आमचे अतिथी. तुमच्या भोजनाचे पदार्थ करण्यात आम्ही गुंतलो होतो.' गांधीजींना अतीव दुःख झाले. त्यांनी तात्काळ निर्णय घेतला. देशातली अर्धी शक्ती जर केवळ चविष्ट स्वयंपाक करण्यात नष्ट होत असेल तर स्वराज्य संग्रामाला वेग कसा येणार ? आणि त्यांनी शपथ घेतली की, जेवणात कमीतकमी पदार्थ खायचे.
 'संयम' हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे. संयम असेल तर केवळ व्यक्तीचे नव्हे तर समाजाचे जीवनही रसमय, गंधमय होते. दुसऱ्याच्या भाकरीचा विचार करण्याची, एक तीळ सातजणात वाटून खाण्याची परंपरा आम्ही जपली तर आमच्या देशातील शंभरातले तीसजण एक वेळेला उपाशी का राहतील ? जे आज राहतात ! आमच्या जवळ जे अधिक्याने असते, ते आम्ही समाजाला परत द्यायचे असते. आम्ही त्या 'अधिक्या'चे विश्वस्त असतो. दानाची परंपरा त्यातूनच आली. भारतीय जीवनपद्धतीत दानाला अपार महत्त्व आहे. जे आपले आहे ते निरामयतेने दुसऱ्याला देण्याची सवय विविध व्रतांच्या, सणांच्या माध्यमातून समाजाच्या जगण्याच्या रीतीत नोंदविली गेली आहे. संक्रातीच्या वाणवशामागे हीच भावना असते.
 अशावेळी आठवतात स्वा. सावरकर. त्यांनी आपल्या पत्नीला विनंती केली होती, 'हळदी-कुंकू' खणनारळ देऊन तू जरूर सण कर. पण गरजवंताला दान दे. रस्ते झाडणाऱ्या, भंगीकाम करणाऱ्या महिलांना खण नारळ दे. 'परंपरा कागदी पद्धतीने पाळण्याऐवजी त्यांच्या गाभ्याचा...अंतरंगाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची परंपरा कधी निर्माण होणार ? आपण आवर्जून निर्माण करणार?

■ ■ ■

मनतरंग / १७२