पान:मनतरंग.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 स्वामी विवेकानंदानी 'दरिद्रीनाराण' हा शब्द प्रथम वापरला. ते म्हणतात, "उपाशी पोटी असणाऱ्यांना धर्माचा उपदेश करणे म्हणजे दुःखावर डागण्या देण्यासारखे आहे. त्यांना भाकरी हाच परमेश्वर होय." भाकरी पोटात गेल्यानंतरच परमेश्वराचा शोध घेणारा 'कोळी' मानवी मनाच्या भिंतीवरून विविध ज्ञानविज्ञान कलांची जाळी बांधू लागला. हा कोळीही असा चिवट की दहादा नव्हे तर शेकडोवेळा भिंतीवरून खाली पडला, तऱ्हेतऱ्हेच्या नवविचारांच्या कुंचांनी ही रेशमी जाळी झाडून झटकून टाकण्याचे हजारो प्रयत्न झाले तरी पुन्हा तितक्याच उत्साहाने जोमाने हा भिंतीवर चढतो आणि जाळी विणत राहतो. किंबहुना या उभ्या आडव्या तिरप्या रेशमी जाळ्यांनीच प्रत्येक शतकाचे क्षितिज रुंदावत नेले आहे.
 भाकरी हा सर्वात्मक ईश्वर आहे. भाकरीला नसते जात. नसतो पंथ. नसतो धर्म. ती कर्माचे... श्रमाचे फलित असते. ती साक्षात कला असते, म्हणूनच चवदार असते. ती माणसाला उजेडाच्या दिशेने नेणारी असते. मात्र भाकरीने पोट भरल्यावरही माणूस दुसऱ्याच्या रिकाम्या पोटाचा विचार करीत नसेल तर तीच भाकरी सैतानाचे रूप धारण करते. पेटलेल्या आगीत जेवढे जळण घालाल तेवढी आग भडकतच जाणार. जीवनाला भाकरी चेतना देणारी, पण भुकेचे रूपांतर

भाकरी आणि परंपरा/ १७१