पान:मनतरंग.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विचार करू शकतात. काळाबरोबर धावू लागतात. केरळची मनोरमा जे करू शकली ते महाराष्ट्रातील यमुना करू शकणार नाही का ? तिला साथ शिक्षित समाजाची...पुरुषांची मिळाली. जिथे शिक्षण सार्वत्रिक असते तिथे, "या बाया शिक्षनामुळं लई बोलाया लागल्यात" अशी अवहेलना पुरुषांकडून होत नाही.
 गणेशोत्सव थाटात सुरू आहेत. त्यानिमित्ताने प्रत्येक मराठी गावात उत्साहाचे वातावरण बहरले आहे. मराठी माणसाच्या मनात स्वातंत्र्यासाठी समर्पित होण्याची चेतना जागवावी म्हणून लोकमान्य टिळकांनी परंपरेला नवा अर्थ... नवा संदर्भ दिला. शंभर वर्षांनंतर तो परत धुळकटला आहे. नाचगाणी, ऑर्केस्ट्रा, यात बुडू पाहतोय. अशावेळी या उत्सवाच्या निमित्ताने गुटखा, तंबाखू, धूम्रपान, परस्त्रीगमन, दारू यांसारख्या व्यसनांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. या व्यसनांचे वाढते आक्रमण 'कारगिल आक्रमणा' पेक्षाही भयानक आहे.

■ ■ ■

मनतरंग / १५०