पान:मनतरंग.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ओढणी अडचणीची नाही होत ? त्या मुलीने लगेच आपल्याकडे सोवळ्या बायका लुगडं नेसताना डोक्यावरून कान न झाकता पदर घेतात, तशी ओढणी लपेटून दाखवली. कमरेला गच्च बांधून कुठेही कसे चढता येते, रायफल चालवता येते तेही दाखवले. पण एक खंत मात्र तिने बोलून दाखवली, "आम्ही कष्टाला तयार आहोत. भरपूर मेहनत करून शिक्षण घेतले. पण महिलांना बंदूक चालवायला शिकवूनही त्यांच्या हातात ती देत नाहीत. कारण काय तर स्त्रिया अत्यंत तापट आणि मनावर, भावनेवर ताबा न ठेवणाऱ्या असतात. त्यांच्या हातात बंदूक दिली तर नको ते घडेल म्हणे. तुमच्याकडेही असेच आहे ?" तिने प्रश्न विचारला होता. माझ्या मैत्रिणीने किरण बेदी, मीरा बोरवणकर, श्रीदेवी गोयल यांच्या शौर्याच्या सत्यकथा तिला सांगितल्या.
 "म्हणूनच आम्हाला तुमच्या देशाबद्दल, तेथील महिलांना मिळणाऱ्या संधीबद्दल उत्सुकता आहे, प्रेम आहे, आमचा धर्मावर विश्वास आहे. आम्हांला अंगाचे प्रदर्शन करणे मुळीच आवडत नाही. पण आम्हालाही पुरुषांसारखीच संधी मिळायला हवी." ती म्हणाली.

■ ■ ■

मनतरंग / १०८