पान:मनतरंग.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परदेशात सुट्टीसाठी गेलेले. पण घरात आचारी, धुणी, भांडी, झाडझूड करणारी एक महिला आमच्या सेवेसाठी सज्ज. टिकल्यांचे भरतकाम केलेला झगमगीत लेहेंगा, आरशांची गोंडेदार चोळी आणि अगदी साजेशी... मॅचिंगवाली लेहरेदार ओढणी. जणू समुद्राच्या लाटा ओढणीवर नाचताहेत ! लिप्स्टिक, डोळ्यात सुरमा, चेहेऱ्यावर मेकअपची कल्हई. सारे साग्रसंगीत. आमचे आंघोळीचे पाणी काढून दिल्याचे सांगायला आली तेव्हा तिने आदबीने सांगितले.
 "मॅडम, ड्रेसिंग टेबलपे मेकअपका पुरा सामान रखा है, आप इस्तेमाल कर सकते है."
 मी न राहवून तिला नाव विचारले. गाव विचारले, शिक्षण, मुलं वगैरे आलेच. ती मूळ पंजाब-राजस्थानच्या सीमेवरच्या खेड्यातली. पोटासाठी माहेर आणि सासरच्या दोन पिढ्यांमागचे लोक दिल्लीत येऊन स्थिरावले. शिक्षण म्हणजे काला अक्षर भैस बराबर. कळायला लागलं की, आईसोबत कामाला जायचे. वयात आली मुलगी की, सगाई मग ब्याह.
 "काय सुरेख मेकप केला आहेस गं. कुठे शिकलीस ? आणि एवढ्या महागाईची क्रिम्स परवडतात तुला...' मी शब्दांत कौतुकाचे फुगे भरून विचारले.
 "मैडम, यह दिल्ली है. इथे चांगल्या पगाराचं काम मिळवायचं तर असं सजधजकेही रहेना पडता. भलेही ते काम झाडझुडीचे असो. आता माझंच पहाना. लग्न झालं बारव्यासाली. 'गौना' झाला तेव्हा पंधराची होते. पाच बरसात तीन लेकरं जलमली. सुसराजी, माझा नवरा, दीर मिळून पंधरा हजार घरात येतात. पण खाणारी आम्ही आठ माणसं. झोपडीचा किराया जातो दीड हजार रूपये मग मी पण कामाला जाऊ लागले. ही वस्ती मोठ्यांची हाय. हितं मला निसत्या धुणं, भांडी नि झाडझुडीचे ढाई हजार मिळतात. तुमी हितल्या कोनच्या पन घरातली झाडुवाली पहा. ती अशीच दिसंल माज्यासारखी. ढाई हजारातले चार-दोनशे रूपये थोबाडावर घालायचे. पण काम तर इज्जतीचं हाय. पण रस्त्यावरून जाताना मन घाबरतंच. अशा वेळी हातभर घुगट ओढून घ्याचा नि सरसर घर गाठायचं !" सुखदा सांगत होती.
 पाकिस्तानातल्या आठवणी ऐकताना सुखदाची आठवण झाली. माझ्या मैत्रिणीला पाकिस्तानातल्या स्त्री पोलीसही भेटल्या. काही बास्केटबॉल खेळाडू भेटल्या. पोलीस महिलेस मैत्रिणीने विचारलं की, त्यांचा घोळदार पोषाख, विशेषतः

मत बाँटो इन्सान को ! / १०७