पान:मनतरंग.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 हे मोहोराचे दिवस तसे क्षणजीवीच ! मोहाराचे देखणेपण डोळाभर अनुभवण्याआधीच बाळकैऱ्यांचे डूल पानापानातून डुलू लागतात आणि कैरीच्या खमंग लोणच्याची चव जिभेलाच नव्हे तर जिवाला चटक लावून जाते.
 आंब्याचा मोहोर झडू लागतोय तोवर कडुलिंबाच्या झाडांवरून गंधकिन्नरींचा मेळा दहादिशांनी धावू लागतो. कडुलिंबाला 'कडू' का म्हणावे असा प्रश्न पडावा इतका गोड वास या फुलांना... नव्हे मोहराला असतो. ज्वारीच्या दाण्याइतकी चिमुकली, पण पूर्णफुलाचा आकार असलेली ही विलक्षण नाजूक फुलं, पानांची हिरवाइ झाकून टाकतात. चैत्रातली कडुलिंबाची मोहरलेली डौलदार पेढेघाटी झाडं पाहिली की वाटतं चादणं चार दिवसाच्या सुट्टीसाठी जणू या 'माथेरान'ला आलंय.
 मी पुसदला निघाले होते. शिवरात्र मावळली की, उन्हाचे फुलोर चटचटायला लागतात, त्यातून पंचवीस वर्षापूर्वीचा 'यष्टी' तला प्रवास! तेव्हाच्या 'एस्टी'चा निळा रंगही म्हातारीच्या तव्यासारखा तापायचा. तर अशा या भर दुपारच्या प्रवासाला वैतागून मी खिडकीबाहेर नजर टाकली नि काय ? भवतालचे डोंगर...नव्हे टेकड्या लालचुटूक फुलांनी अगदी आकंठ लखडल्या होत्या. पानांचा कुठेच पत्ता नाही. फक्त लालड्या पोवळ्यांनी रुमझुमणारी झाडं. न राहवून मी शेजारच्या माणसाला विचारलंच की ही झाडं कोणती आणि तो माझ्याकडे चकित नजरेने पाहू लागला, नि विचारले "बहिन येवढं बी म्हाईत न्हाई तुले ? काहूनची हाईस ?"
 ती पळसाची झाडं होती. तेव्हा कुठे लक्षात आलं की 'पळसाला पाने तीनच' असे का म्हणतात ते ?
 घर आणि कॉलेजच्या वाटेवर एक कुठलंसं झाड आहे. वर्षभर ते कधीच नजरेला साद घालत नाही. पण एक दिवस अचानक लक्षात येते की शेलाट्या बांध्याची नववयसा नृत्यांगना पोपटी अंजिरी रंगाची रेशमी ओढणी सावरीत कुणाची तरी वाट पाहत उभी आहे... चार-दोन पावलं पुढे यावे तर जाणवते की गेला महिनाभर पिवळ्या रंगाच्या खुळखुळ पहाड्या शेंगा अंगभर वागवीत बसलेल्या ध्यानस्थ शिशिराचेही डोळे उघडू लागले आहेत. विलक्षण मदिर गंधाने भारून टाकणारी फिक्कट हिरव्या पांढऱ्या रंगाची फुलं आता वसंताच्या स्वागतासाठी चवऱ्या ढाळू लागली आहेत. अशावेळी 'कालनिर्णया' वर नजर न टाकताच

मोहोराचे दिवस/१०१