पान:मनतरंग.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 रामशास्त्रींच्या नावाने एक गोष्ट सांगितली जाते. ती रामशास्त्रीच्या नावाला शोभेशी आहे. त्या काळात पुण्यातील एक लाल लुगड्यातील बाई अप्रतिम प्रवचन करीत असे. तिच्या प्रवचनांची ख्याती त्या परिसरात पसरली होती. शास्त्रीजींना हे प्रवचन ऐकण्याची इच्छा झाली आणि ते आवर्जून तेथे गेले. त्या प्रवचनकार महिलेने शास्त्रीजींसमोर एक प्रश्न टाकला.
 "शास्त्रीजी, परमेश्वराने तुम्हाला आणि मला, एकाच रीतीने जन्म दिला. स्त्री-पुरुषांना होणारे रोग सारखेच. भावभावना सारख्या, मग माझे पती वयाच्या आठव्या वर्षी मरण पावले म्हणून, वयात येताच मला विद्रूप केले. जीवनाचे, आनंदाचे सारे दरवाजे बंद करून टाकले. पण पुरुषाची पत्नी म्हातारपणी मरण पावली तरी त्याचा दुसरा विवाह मात्र १४ व्या दिवशीही होऊ शकतो. हे असे का ? निसर्गाने... परमेश्वराने आम्हाला न्याय दिला; पण समाजाने, धर्माने दिला का नाही ?"
 शास्त्रीजी क्षणभर चक्रावले चकितही झाले. ते उत्तरले-
 "बाई गं, तुझा प्रश्न योग्य आहे. आजवरचे कायदे पुरुषांनी केले. त्यात तुमच्या अडचणींचा आम्ही विचार केला नाही. पण एक दिवस असा येईल त्यावेळी ज्ञानाच्या बळावर महिलांत कायदे करण्याची क्षमता येईल, ताकद येईल.

मनतरंग / ९८