पान:मजूर.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
मजूर


वर्णन पुन्हापुन्हां भाईजवळ घोळून घोळून चालविलें होतें ! भाईही आपल्या बहिणीच्या बोलण्याकडे सकौतुक लक्ष देत होता ! वास्तवीक आमची सारी हकीकत तिनें रात्री आमच्याकडून येतांच भाईला सांगितली होती. पण आतां तीच हकीकत पहिल्याइतकीच प्रेमानें बबूताई सांगत होती; व भाई जशी कांहीं ही हकीकत पहिल्यानेंच बबूताईच्या तोंडून ऐकत आहोत, अशा भावनेनें सप्रेम व सादर ऐकत होता !
 ज्या गरीबाच्या मुलीला आपण संकटांत साह्य केलें, तिला आपल्या बहिणीनें मैत्रिणच केली -गरीबांशी मिसळण्यांत, त्यांच्या उपयोगी पड- ण्यांत आपल्यावरही आपल्या बहिणीनें ताण केली, याबद्दल भाईला जें कांहीं मनांतून वाटत असेल, त्याचे सात्विक चित्र यावेळीं भाईच्या चेह- यावर खेळत होतें !
 बबूताई माझ्या गुणावें, शहाणपणाचें, शाळेंत तिला अभ्यासाला मदत करण्याच्या माझ्या तत्परतेचें, माझ्या लेखिका होण्याच्या महत्वाकांक्षेचें, दादा मला त्या बाबतींत प्रोत्साहन देत असतो त्याचें, भाईजवळ एक सारखें वर्णन करीत सुटली होती !
 बराच उशीर झाला; आम्हीं घरीं यावयाला निघालों. बबूताईचा भाई आमच्याशी फारच प्रेमळपणाने बोलला. रत्नुला त्यानें कांहीं चित्रे, खाऊ वगैरे दिला. पुन्हां वरचेवर यायला सांगितलें 'आपणही सवडीप्रमाणें बबूताईबरोबर तुमच्या तिथें येत जाऊं !' म्हणून कबूल केलें !
 बबूताईने मोटारीतून आम्हांला आमच्या बिन्हाडीं पोंचविलें.
 संध्याकाळ झाली होती. दादा परत यावयाची वेळ झाली होती ! बबूताई निरोप घेऊन, व परत येईन म्हणून कबूल करून परत गेली ! मी रत्नुला घेऊन माडीवर आले ! -