पान:मजूर.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
मजूर


वस्तुस्थितीचा इतका कठोरपणा असला तरी त्याला त्याचें कांहीं वाटत नव्हतें ! सध्यां दादाचें वय अवघें एकोणीस वर्षांचें, माझें चौदा वर्षाचें, आणि रत्नु तर अवघा पांच वर्षांचा होता. खेड्यांत असतांनाची दादाची शरीरयष्टी राहिली नव्हती. कष्टानें आणि दगदगीनें त्याचें रूप पार बदलून गेलें होतें. आई मनाची खंबीर खरी; पण बाबांच्या अकाली मृत्यूचा शोक तिला चांगलाच जाणवला होता. ती अलिकडे नेहमी अजारी पडे! या खपेला तर ती चांगली दोन अडीच महिने आजारी होती. या दुखण्यांतून आपण उठणार नाहीं, असेंच ती अजारी पडल्यापासून म्हणत सुटली होती. तरी दादा, मी तिला सारखा धीर देत होतोंच. आम्हीं बोलू लागलों म्हणजे ती गप्प बसे. पण ती केवळ आमच्या समजुतीकरितां. तिच्या चेहन्यावर तिला धीर आला आहे, असे कधी आम्हांला अलीकडे दिसत नसे !
 आईला शक्य तितके हात पाय गाळू द्यायचे नाहींत, आपण हातपाय गाळायचे नाहींत. तिला त्रास होईल, तिच्या अधु मनाला धक्का बसेल, असें आम्हीं आमच्या हातून चुकून ही होऊं देत नसूं. तिच्या समोर जें काय बोलासवरायचं, तें तिला थोडा तरी धीर येईल, तिच्या आमच्या विषयींच्या ज्या कांहीं आशा असतील, त्या आशा फलद्रूप होणार आहेत, आईच्या कल्पनेप्रमाणें आम्हांला ती स्थिति प्राप्त आतां लवकरच होणार आहे, अशा सारखेंच बोलत असूं. आईच्या आज्ञेबाहेर जायचे नाहीं. तिच्या जवळ लांडीलबाडी करावयाची नाहीं. प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींत आईची सल्ला आणि आशिर्वाद घेतल्याखेरीज पाऊल पुढे टाका- यचें नाहीं, असें जसें कांहीं दादाच्या वर्तनांत ठरून गेले होते.
 अशी कांहीं सगळी आमच्या आयुष्याची कहाणी होती. कुणापुढे तोंड बेंगाडायचें नाहीं. कुणाच्या तोंडाकडे आशाळभूतासारखे 'आ' करून पाह्यचें नाहीं. लोकाचें लुबाडण्यांत पुरुषार्थ मानायाचा नाहीं, लोकांच्या कुचाळक्या हातांतला उद्योग बाजूला सारून करण्यांत वेळ दवडावयाचा नाहीं. दुसऱ्याच्या योग्य अडचणीच्या वेळीं सहाय्याला, धांवण्यांत अंगचोरपणा मुळींच करावयाचा नाहीं. भेटेल त्याला जीवाचा जीवलग समजावयाचा नाहीं, कीं प्रत्येकाशीं जाणून बुजून किंवा न कळत