Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/७९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बोलावतात. बोडण भरताना एखादीच्या अंगात संचार होतो. तिला मग प्रश्न विचारतात. शकुन विचारतात.बोडणातील अन्नपूर्णेला वाहण्यासाठी कणकेचे दागिने करतात. त्यात बांगड्या, मंगळसूत्र, कुंकवाचा करंडा असतोच. तसेच कणकेची घागर लहानशी वा कुंभ करून त्यात थेंबभर दूध घालून तो कुंभ कणकेच्या झाकणाने बंद करतात. हे दागिने कुंभ देवीसमोर ठेवतात. आधी गणपतीची पूजा होते. नंतर अन्नपूर्णेची पूजा करतात. आरती केल्यानंतर बोडण कालवण्यास सुरुवात होते.
 मराठवाड्यात कोकणस्थ समाज मोठ्या प्रमाणावर स्थिरावला आहे. विवाहात मुलीला अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण देण्याची परंपरा आहे.
 बोडणाचे ताम्हण वा परात ठेवतात, त्या खाली विशिष्ट रांगोळी काढतात. ती बोडणाचे वेळी काढावीच लागते.
 कुवांरभूमीची पूजा : कुमारीपूजा -
 श्रावण शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. घरातील मुले निरोगी राहावीत, घर मुलाबाळांनी भरलेले राहावे यासाठी शुक्रवारी पुरणाचा नैवेद्य करतात. लेकुरवाळ्या स्त्रीस जेवण्यास बोलावून तिचा सन्मान करतात. त्या दिवशी सवाष्णीबरोबर कुमारिकेस बोलविले जाते. कुमारीपूजेचे विशेष महत्त्व नवरात्रात असते. नऊ दिवस कुमारिकेस जेवण्यास बोलवतात. हे शक्य नसेल तर तिला दूधसाखर तरी देतात. काही घरांतून पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन अशा चढत्या क्रमांनी नवमीस नऊ कुमारिकांची सन्मानपूर्वक पूजा करतात. त्यांचे पाय धुतात. त्यावर हळदकुंकू चढवतात. दूध वा खिरीचा प्रसाद देतात. काही घरी रोज एक नवा पदार्थ वाढवतात. त्यात फळांचाही समावेश असतो. गणेश ही प्राचीन लोक देवता असून तिच्या हातात विविध फळे आणि तांदळाच्या ओंब्या आहेत. लक्ष्मी, गणेशाच्या हातात कमळ आणि डाळिंब आहे. ग्रीक स्त्री देवतांच्या हातात डाळिंब असते. डाळिंबाचा रंग लाल, मासिक पाळीचा रजस्वल रंग लाल. म्हणून या रंगाचा संबंध सुपीकतेशी जोडला असावा. नर्मदेत सापडणाऱ्या लाल गोट्यांना गणेश दगड म्हणतात. गणेशफुलांचा रंगही लाल. सरस्वती ही कौमार्याचे प्रतीक मानली जाते. तिच्या संदर्भातला एक श्लोक असा-

७४
भूमी आणि स्त्री