Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/६२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 स्त्री आणि भूमी यांच्यातील सर्जनक्षमतेबद्दल आदिमानवाला कुतूहल -
 स्त्रीत असणाऱ्या सर्जनशक्तीबद्दल आदिमानवाला नेहमीच उत्सुकता, आकर्षण, भय आणि विलक्षण आदर वाटला आहे. आदिकाळापासून जगण्याचा केंद्रबिंदू जमिनीतून निर्माण होणारे धान्य, कंदमुळे, फळे, पशुधन हा होता. भूमीची सर्जनक्षमता म्हणजेच सुफलनशक्ती वाढली तर धनधान्य समृद्धी निर्माण होते आणि माणसाचे जगणे सुखकर होते. ही समृद्धी निर्माण करण्यासाठी मानवी श्रमाची, हातांची गरज असते याची जाण आदिमानवाला होती आणि मानवी धन निर्माण करण्याची क्षमता, शक्ती स्त्रीत असते. भूमी आणि स्त्री यांच्यातील सर्जनक्षमतेत असणारे साम्य हा मानवाच्या कुतुहलाचा आणि निरीक्षणाचा विषय होता. त्याने या दोहोंच्यातील सर्जनक्षमता वाढवण्यासाठी विविध प्रयोग केले. त्यातूनच मानवाचा प्राथमिक यातुप्रधान धर्म निर्माण झाला.
 मानवाचे प्राथमिक विज्ञान -
 आदिम मानवाचा धर्म केवळ भ्रांतीने भारलेला आहे असे अनेकांना वाटते. पण ते खरे नव्हे. वन्य लोकांच्या धर्मात भ्रांती जरूर आहे पण तिला वास्तवाचा आधार असतो. प्रतीकाचा वापर करून ते सामाजिक गरजा व सामुदायिक हितसंबंध व्यक्त करतात. यातुविद्येचे शास्त्र बुद्धिवादाला पटण्यासारखे नसले तरी ते बिनतोड असते. त्यात संभवनीय गोष्टी गृहीत धरलेल्या असतात. दुर्गा भागवत या संदर्भात लिहितात, 'संभवनीयता हे जादूविद्येचे प्रमुख उद्दिष्ट. जादूविद्येचे मुख्य प्रकार दोन. या दोनही प्रकारात क्रिया व क्रियेमागचे तत्व यांना प्राधान्य असते.' पहिल्या प्रकाराला Sympathetic - सहानुभावात्मक जादूविद्या म्हणता येईल. दुसरा प्रकार Homeopathic जादूविद्या, या शब्दाचे भाषांतर करणे कठीण आहे असे सांगून दुर्गाबाई त्यासाठी 'समानोत्पत्तिक' जादूविद्या हा शब्द वापरतात. जादू हे मानवाचे प्राथमिक विज्ञान होते असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
 विश्वातील 'असु' शक्ती आणि कृषिविधी -
 स्त्री आणि भूमी यांच्यातील नवनिर्मिती करण्याचे सामर्थ्य जाणून यांच्यातील साधर्म्य आणि सहचर्य यावर निश्चित स्वरूपाचे ठोकताळे त्याने बांधले. यालाच फ्रेझर स्युडोसायन्स (Psudoscience) म्हणतो. या दोनही प्रकारच्या जादूविद्येवर

भूमी आणि स्त्री
५७