पान:भूमी आणि स्त्री.pdf/६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आधारित असे विधी भूमीची सुफलनशक्ती वाढावी यासाठी कृषिकर्मात निर्माण केले. उदा. पावसाळ्यातले नाच, वाढून डोलणाऱ्या पिकांची नक्कल असते. दुर्गाताई नोंदवतात की झिम्मा, फुगडी ह्या खेळांचे मूळ असेच असले पाहिजे. विश्वातील सर्व वस्तूंमध्ये 'असु' शक्ती असते. ती भूमी व स्त्रीत विशेष करून असते. हे सामर्थ्य विशिष्ट वा विशिष्ट सामूहिक कृतीतून, सामूहिक मंत्रगानातून वाढविता येते वा कमीही करता येते अशी श्रद्धा प्राथमिक कृषिजीवन जगणान्या मानवसमूहात होती. 'भारतीय संस्कृती' चे विवेचन करताना विल ड्युरांट,येथील लोकजीवनाबद्दल नोंदवतात, 'छोटा नागपूरमध्ये कापणीचा हंगाम सार्वत्रिक उच्छृखल वर्तनाद्वारे एक प्रकारे इशारतच असे. पुरुष सारी सभ्यता व स्त्रिया सारी लज्जा गुंडाळून ठेवीत. आणि तरूण मुलींना स्वाभाविक संपूर्ण मोकळीक असे. राजमहल टेकड्यात परगणाईत नावाची एक शेतकरी जमात असून से दरसाल शेतकी उत्सव साजरा करीत. या उत्सवात अविवाहितांना संपूर्ण संभोग स्वातंत्र्य मिळे'. शेत आणि कुटुंब सुपीक व्हावे या हेतूने हे उत्सव साजरे केले जात. हे नोंदवताना विल ड्युरांट लिहितात, 'ते प्राचीन जादूटोण्याचे अवशेष होते'.
 विधी : प्रतीकरूपात आराधना -
 पाऊस पडावा म्हणून विवस्त्र स्त्रीच्या देहाभोवती लतावेली गुंडाळून, तिच्या माथ्यावर सच्छिद्र जलकुंभ देऊन तिची मिरवणूक काढतात. या विधीत स्त्रीला भूमीस्वरूप दिले आहे आणि कुंभरूप नभातून तिच्या अंगावर पाऊस पडून वनस्पतीसृष्टी उगवते असे कल्पिले आहे. अशाच एका यात्वात्मक सुफलीकरण विधीचे वर्णन बाणभट्टाच्या हर्षचरित्रात आहे. राणी विलासवती पुत्रप्राप्तीसाठी विविधप्रकारे साधना करीत असते. त्यात कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी रात्री सार्वजनीक चौकात यंत्रपूजा करून नग्न स्नान केल्याचा उल्लेख आहे. स्नान चौरस्त्यावर आणि नग्न होऊन करणे म्हणजे पर्जन्यदेवाने भूमीप्रमाणेच स्त्रीचेही सुफलीकरण करावे ही श्रद्धा या विधीमागे असावी. जलवर्षाव, सूर्यकिरणांचा स्पर्श यामुळे स्त्रिया सुफलित होतात अशी श्रद्धा आजही वन्य समाजातून आढळते. सर्वसाधारण लोकांना लिंग आणि योनी यात अश्लील असे काही वाटत नाही. मॅडोना आपल्या बालकाला स्तनपान देत आहे या चित्राचे चिंतन करताना ख्रिस्ती माणसाच्या मनात आश्लील विचार येत नाहीत तसेच हे आहे. एखादी गोष्ट रुढ झाली की ती उचित मानली जाऊ लागते. तिला कालौघात पावित्र्यही लाभते.

५८
भूमी आणि स्त्री