Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परिस्थितीत उदयाला आले असावेत असे मत 'लोकायत' या ग्रंथात लोकायत दर्शनाचे थोर अभ्यासक डॉ. स. रा. गाडगीळ नोंदवितात.
 आपल्याकडील श्रावण भाद्रपदात आचरावयाच्या व्रतांचे सूक्ष्म अवलोकन केल्यास स्त्रीमाहात्म्य आणि कृषिसमृद्धी यांचा अन्योन्य संबंध लक्षात येतो. गणेशचतुर्थी व्रतात गणेश या पुरुष देवतेला स्थान असले तरी खरे महत्त्व गौरींना असते. कुलाचार लक्ष्म्यांचा निमित्ताने साजरा होतो. कोकणांत दीड दिवसांचा गणपती असतो. गणपतीला निरोप देतात आणि गौर आणतात. गौरीची काही गीते अशी...

गणोबा आला आला
गवर का ग नाही?
साखळ्या लेती लेती
पाठीमागून येती
गवर आली शेतापाशी गवर ss

शेतवाला विचारतो

"का ग गौराई एकली
का ग हुईन एकली
मी का हुईन एकंली
पुढे हाय गणेश बाळ मागं शंकर भ्रतार"

 कोकण-कोल्हापूरकडे गौरी गणपतीला जायचे असा वाक्प्रचार आहे. तर मराठवाड्यातही लक्ष्म्यांसाठी घरी जायचे असे म्हणतात. अवघे घर एकत्र जमते. या स्त्रीप्रधान व्रताचे वैशिष्ट्य श्री. गुप्ते१८ यांनी नमूद केले आहे ते असे -
 In regard to chief Goddess Gauri, the Goddes of harvest, one great peculiarity remains to be mentioned. She supposed to have been followed by her husband shiva, secretly, who remains hidden under the outer fold of her sari and is represented by Lota (Pot) covered by coconut and filed with rice.

२०६
भूमी आणि स्त्री