मातीच्या सुगड्याला रंगवून त्यात माती घालतात. विहिरीचे पाणी समूहाने गाणी म्हणत आणतात आणि त्या सुगड्यात बीज पेरून त्यात ते पाणी विधिपूर्वक शिंपडतात. या कुंड्यांची रोज पूजा केली जाते. समूहाने गाणी गातात. यात विशेषत्वाने सहभाग कुमारिकांचा, नवविवाहित तरुणींचा असतो. उगवत्या धान्याची ही पूजा मातीची सुफलनशक्ती वाढावी यासाठीच असली पाहिजे. ही पूजा महिला एकत्र येऊन करतात. महाराष्ट्रात गौर पाळण्यात बसते. सुगड वा पसरट वेळणीत माती पसरून त्यात बीज पेरतात. अक्षय्यतृतीयेला अंकुरलेल्या धान्याची पाण्यात विधिपूर्वक बोळवण करतात. या काळात स्त्रिया हळदीकुंकवाचा समारंभ करून कैरीचे पन्हे, हरभऱ्याची ओली डाळ प्रसाद म्हणून देतात. चैत्रात उन्हे प्रखर होऊ लागतात. नंतर येणाऱ्या ग्रीष्म वैशाखाच्या कहारात धरती भाजून निघते. पिकांना त्रासदायक असणारे जीवजंतू नष्ट होतात. जमीन भाजल्यामुळे तिची पाणी साठवण्याची क्षमता वाढते. सूर्याला वैश्विक अश्व मानले जाते. सूर्य हा प्रकाशवृक्ष आहे. संसारवृक्षाची निर्मिती त्याच्यामुळेच होते. सूर्यकिरणांतून जणु चैतन्याचे बीज भूमीत पेरले जाते.३ विश्वातील सर्व रस सूर्य शोषून घेतो. हे रस सूर्यस्थ झाल्यावर तेथील उष्णतेने त्यांचा मधु-पाक होतो. तो वृष्टीच्या रूपाने पृथ्वीवर येतो आणि सर्व धान्य पोसतो,जीवसृष्टीला जीवन देतो. गौरीच्या प्रतीकाद्वारे जणु भूमी, जलतत्त्व आणि सूर्यरूपी बीज तत्त्व या तिहींचा पूजा केली जाते.
भाद्रपद आश्विन : सर्जनवर्षन शक्तीची आराधना -
भाद्रपद आश्विनात खरिपाची पिके.... पावसावर पोसली जाणारी पिके तरारून वर आलेली असतात. तर रबीच्या पिकांच्या पेरणीची तयारी सुरू असते. आश्विनात खरिपाचे पीक दुधात येते आणि याच काळात हादगा भुलाबाई, सांझी, नवरात्र, बदकम्मा आदी कुमारिकांचे उत्सव भारतभर साजरे होतात. हे उत्सवही सर्जनशक्तीची आराधना करण्याच्या भूमिकेतून साजरे होत असावेत. जमिनीची उर्वराशक्ती वाढून धान्यलक्ष्मीची वृद्धी व्हावी यासाठी हे उत्सव साजरे केले जातात.
अन्ननिर्मिती आदिजीवनाची प्रेरणा -
भारतातील मूळ आदिकालीन संस्कृती शिकार आणि शेतीशी निगडित होती. प्राथमिक अवस्थेतील कृषिजीवी समाजाला भूमी आणि यांच्यातील निर्मिती करणाऱ्या सर्जनशक्तीविषयी, या सामर्थ्याविषयी अपार आकर्षण होते. स्त्री हे
पान:भूमी आणि स्त्री.pdf/२१
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६
भूमी आणि स्त्री