पान:भूमी आणि स्त्री.pdf/२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जीवनव्यवस्थेचे केंद्र सर्जन करणारे 'मातृत्व' हे होते. आदिम मानवाची मातृत्वावर अपार श्रद्धा होती. ज्यावेळेस समाजाची बांधणी झाली, समाजाचे नियमन सुरू झाले त्यावेळी सर्जन करणारी स्त्री ही समाजाचा प्रमुख घटक बनली. तिची सत्ता समाजाने स्वीकारली. त्यातून मातृसत्ताक जीवनव्यवस्था निर्माण झाली. संपूर्ण जगात प्रारंभीच्या काळात ईश्वाराचे पूजन आदिमातेच्या रूपात केलेले आढळते. इजिप्तमधील इसिस, ग्रीकमधील डिमिटर, रोममधील व्हिनस या स्त्रीदेवतांची पूजा त्या त्या देशात ख्रिस्तपूर्व काळांत प्रचलित होती. या देवता समृद्धीचे प्रतीक होत्या. त्यांच्या पूजेशी संबंधित असलेले विधी प्रामुख्याने धान्य, पशु, प्रजा यांच्या विपुलतेसाठी असत.
 भारतीय लोक परंपरांतील प्राणभूत एकात्मता -
 भारतीय संस्कृती जगातील अतिप्राचीन संस्कृतींपैकी एक. येथेही मातृसत्ताक जीवनव्यवस्था आणि योनिपूजेचे प्रचलन होते. सर्जनाच्या प्रक्रियेत 'स्त्री तत्त्व' प्रत्यक्षपणे क्रियाशील असले तरी अप्रत्यक्षरीत्या 'पुरुष तत्त्व' बीज व सलिल रूपाने सर्जनात सहभागी असते,याची जाणीव झाल्यावर पुरुष तत्त्वांचे पूजन लिंग स्वरूपात होऊ लागले. दैवी दाम्पत्यांची निर्मिती झाली, उदा. - गौरी आणि शंकर. लक्ष्मी आणि विष्णु, इजिप्तमधील 'इसिस आणि होरस' इत्यादी. अतिविशाल आणि प्राचीन अशा या देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. भारतीय लोकजीवन विविध उत्सव, सण, व्रते, यात्रा, विधी, तत्संबंधी गाणी यांनी समृद्ध झालेले आहे. हजारो वर्षांपूर्वीपासूनच्या सांस्कृतिक हालचाली व प्रवासाच्या नोंदी आणि खुणा त्यातून प्रतिबिंबित होतात. प्रत्येक प्रान्तातील भाषा, वेषभूषा, रीतीरिवाज जरी भिन्न असले तरी त्यात प्राणभूत एकात्मता आहे.
 चैत्रगौर : प्रकाशवृक्ष सूर्याशी असलेल्या धरतीच्या नात्याचा सत्कार -
  लोकपरंपरांशी जोडलेले उत्सव, सण, व्रते, विधी, तत्संबंधी गाणी, लोककथा, लोकनाट्य आदीतून परस्परांतील साधर्म्य सतत जाणवते. उदा. - रबीची पिके माघ, फाल्गुनात हाती येऊ लागतात. सर्जनाच्या वेदनांनी श्रमलेली धरती विसाव्यासाठी माहेरी येते ती चैत्रात, चैत्र गौरीचे पूजन थोड्या फार फरकाने सर्वत्र साजरे होतो. महाराष्ट्रात चैत्रगौर वद्य तृतीयेला विराजते ती अक्षय्य तृतीयेपर्यंत. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशांत गणगौर अत्यन्त थाटात पूजिली जाते.

भूमी आणि स्त्री
१५