चिव्याच्या हंसा देतो माझा बंधु
जाईन मी दुबळ्या माहेरा
श्रावण संपला भादवा आला
शिवशंकरा जाऊ द्या मला माहेरा
शंकर म्हणतो -
सोन्याचा नारळ देतो
नको तू जाऊ दुबळ्या माहेरा
नारळीचा नारळ देतो माझा बंधु
जाईन मी दुबळ्या माहेरा
सोन्याच्या नारळापेक्षा नारळीच्या झाडाचा, ममतेचा पाण्याने भरलेला, आपुलकीच्या गोड गराने रुचकर असा नारळ अधिक अस्सल असतो ना ?
स्त्रियांना पर्यावरणाची जाण मुळात असते -
गौरी वा लक्ष्म्यांच्या गाण्यांतून स्त्रियांच्यात निसर्गाबद्दल विशेष करून पर्यावरणाबद्दल असलेली स्वयंभू जाणीव व्यक्त होते. जीव जन्माला घालताना सोसाव्या लागणाऱ्या वेदना आणि तो जीव बीजापासून परिपक्व होऊन पूर्णावस्थेत येण्यासाठी लागणारा काळ, त्यासाठी त्याचे स्वतःचे रक्त, श्वास, अन्न यातून करावे लागणारे पोषण या गोष्टींचा तिला प्रत्यक्ष अनुभव असतो. म्हणूनच ती सोन्याच्या नारळावर वा पोफळीवर भाळत नाही. शेताच्या बांधाने फिरताना तिला पिकांची जिवंत सळसळ जमिनीशी बांधून ठेवते. जणु तिचे या विश्वाशी अतूट आणि जिवंत नाते असते. ते गाण्यांतून जाणवते.
आज गौरी जाशील ती कधी गौरी येशील?
पाऊस पडे, गंगा भरे येईन मी भादव्यात ....
पडवळीच्या फुलावरनं येईन मी तळपत
पाच पडवळं काढा माझ्या हौशाकरवी ....