पान:भूमी आणि स्त्री.pdf/११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आकारले आहेत. नागपंचमीचे तीन दिवस या 'कल्पनाबंधा'शी जोडले असावेत असे लक्षात आले. अंबाजोगाईतील या संदर्भातील माहितीकोश असलेले कै. आबा ऊर्फ शिवाजीराव लोमटेंशी संपर्क साधला. त्यांनी ठामपणे सांगितले, 'या काळात जमिनीला दुखवायचे नसते.'
 पारधे वाडीतील पेरणी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महिलेने पेरणी करण्याचे 'कसब' स्त्रियांच्यातच असते असे ठामपणे सांगितले. भोंडला भुलाबाईच्या विधी आणि गाण्यांचा शोध घेताना स्त्री आणि भूमी, स्त्री आणि शेती यांच्यातील.अतूट नात्याचा प्रत्यय आला होता. तसेच ही व्रते भूमीच्या सुफलीकरणाशी जोडली गेली आहेत हे लक्षात आले. मोकळ्या आभाळाखाली रानात, स्त्रियांची विशेष करून कुमारिकांची लयबद्ध पावले फिरली आणि त्यांना स्वरांची साथ असेल तर पीक उत्तम येते. या खेळोत्सवांत 'मांडणी'ला महत्त्व असते. स्त्री आणि कुमारिका व्रतात झोका असतो. द्यावापृथ्वी-आकाशभूमी यांच्या मिलनातून भूमी सुफल होते. या दोहोंच्या 'एक' होण्याचा सुभग संकेत 'दोलोत्सवातून' व झोका या कृतीतून मिळतो. डॉ. प्रभाकर मांडे यांच्याशी चर्चा करून शोधप्रबंधासाठी प्रस्तुत विषय निश्चित केला.
 शोधनिबंधाच्या विषयाकडे तटस्थ नजरेने पाहण्याची वृत्ती, चिकित्सक भूमिकेतून निरीक्षण करण्याची भूमिका आवश्यक असते. ही भूमिका नकळत ठसली,डॉ. राममनोहर लोहियांच्या 'ललितलेणी'च्या वाचनातून. डॉ. राम मनोहर लोहियांची प्रतिमा, एक ओबडधोबड राजकारणी म्हणून निश्चित झाली आहे. 'भलत्या वेळी बोलायची खोड असलेला हा माणूस.' 'न ब्रुयात् सत्यमप्रियम्' चा संभावित गुळमुळीतपणा न जाणणारा रसिक आणि रांगडा माणूस म्हणजे डॉ. राम मनोहर लोहिया. १९६६ च्या जानेवारीत त्यांची काही काळ भेट घेण्याचा योग आला. मी मराठी या विषयाचा अभ्यास करते आहे हे कळताच त्यांनी विचारले,"महाराष्ट्रात येताना मला नेहमीच चक्रधर आठवतो. माझे जेवण संपेपर्यंत मला महानुभाव संप्रदाय आणि चक्रधर यांच्या तत्त्वज्ञान व जीवनाशी संदर्भित, काही क्रान्तिकारी मुद्दे व घटना सांग'. या शोधनिबंधातून मला जे मांडायचे आहे. त्याला भलेभक्कम नैतिक आधार वरील उद्गार आणि ललित लेणी यातून मिळाला. डॉ. राम मनोहर लोहियांची मानसिक बैठक पूर्णपणे भारतीय होती.

भूमी आणि स्त्री