पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४

  ६. वाक्यगर्भ--एकाच वाक्यांत तें, पूर्ण झाल्यावांचून, दुसरें वाक्य आलें असतां हा दोष होतो. जसें--
 "बरें तर, रामा ह्मणाला, मीच जाऊन येतों.”
 यांत ‘रामा ह्मणाला, हें मध्येंच दुसरें वाक्य आलें आहे. हेंच ‘रामा ह्मणाला, बरें तर, मीच जाऊन येतों' असें पाहिजे होतें. किंवा जसें--"तुह्मी पाहिजे तितक्या सभा करा व सरकारास अर्ज करा, खरें पाहिलें तर हें करणें वेडेपणाचेंच आहे. आह्मी सरकारांतून हा कायदा पास करून घेतल्यावांचून-तो पास झाल्यासारखाच आहे.-राहणार नाहीं."
 ह्या वाक्यांत मोठ्या टाईपांनीं लिहिलेलीं वाक्यें अधिक आहेत. किंवा जसें--"दुर्जन कितीही चांगला दिसला, तरी, मी खरेंच सांगतों; त्याची संगती करणें चांगलें नाहीं.”
 ७.अरीतिमत्--एकदां ज्या शैलीनें शब्दरचनेस आरंभ केला तीच शेवटपर्यंत न ठेविली असतां हा दोष होतो. जसें-“भिन्न भिन्न स्थानीय, अनवलोकितपूर्व, विविधवेषभूषित, त्या वैदेशिकजनास पाहून, त्याशीं बोलण्यास, त्याबरोबर फिरण्यास, व त्याच्या सहवासांत कांहीं वेळ घालविण्यास मला मोठी पंचाइत पडली.”
 ह्या वाक्यात समासयुक्त संस्कृत शब्दयोजनेच्या शैलीनें आरंभ केला, पण 'पाहून' ह्या शब्दापासून पुढें ती शैली सुटून साधे एकेरी शब्द आहेत, हा दोष आहे. तर पुढेंही तशीच शैली पाहिजे होती.